“येतंव’ ॲप प्रवाशांसह व्यावसायिकांना ठरणार फायदेशीर
कणकवली : ऑटो रिक्षा तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना जोडणाऱ्या “येतव’ या निःशुल्क अॅपचे लोकार्पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतिने पत्रकार परिषदेत देण्यात आली. रविवारी आज सकाळी ११ वाजता येथील कणकवली महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या हॉलमध्ये सदर अॅपचे लोकार्पण होणार आहे, माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर व कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली.

कणकवली येथील हॉटेल एमएच ०७ येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन पारकर व नितीन वाळके बोलत होते. यावेळी व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, राजन पारकर, राजा राजाध्यक्ष, ऑटो रिक्षा चालक – मालक संघटनेचे अण्णा कोदे, महेश आमडोसकर आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे श्री. पारकर म्हणाले, ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आपण नेहेमीच प्रयत्न करत असतो. त्याच धर्तीवर कोकणच्या इंजिनिअर तरुणांनी झेंप ॲप प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून “येतवं’ ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. याचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक, प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडसह इतर तालुक्यात हे ॲप कार्यरत झाले आहे. सदर ॲपच्या अनेक टेस्ट देखील घेण्यात आल्या असून त्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यात. या ॲपचा फायदा रिक्षा, टॅक्सी व्यावसायिकांना देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे.
श्री. वाळके म्हणाले, तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांना देखील तंत्रज्ञानाला तंत्रज्ञानाने उत्तर देणे आज भाग पडत आहे. त्या अनुषंगाने “येतवं’ ॲप महत्वाची भूमिका बजावणार आहे. या ॲपमधून व्यापारी महासंघाचा कोणताही फायदा नसून केवळ सेवा म्हणून हे ॲप जिल्ह्यात कार्यरत करण्यात येणार आहे.
आपल्या हातातील मोबाईल वर प्लेस्टोअर मध्ये “येतवं’ ॲप डाउनलोड करून घ्यावा. त्यावर रजिस्ट्रेशन केल्यावर आपल्याला सदर ॲप च्या माध्यमातून सेवा मिळणार आहे. हे ॲप हाताळायला अत्यंत सोपे आहे. ॲपवर रिक्षा चालकाचे नाव, रिक्षाचा नंबर, चालकाचा संपर्क क्रमांक प्रत्यक्ष दिसणार आहे. थेट संपर्कामुळे सुरक्षितताही राहणार आहे. सामाजिक बांधिलकी आणि सेवा म्हणून जिल्हा व्यापारी महासंघ हे काम करत असून यामध्ये ग्राहक व वाहनधारक यांच्यात थेट संपर्क व व्यवहार होणार असल्याने यामध्ये कोणतेही कमिशन अथवा फसवणूक आदी कोणतीही बाब राहणार नाही. पुढील काळात ट्रक, टेम्पो आदी मालवाहतूक करणाऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे श्री. वाळके यांनी सांगितले.