ओरोस : उन्हाळा सुरू होताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटतात. त्यामुळे मिळेल तेथून दूषित पाणी आणावे लागते. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांची वेळोवेळी चाचणी केली जाते. ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात.
३१ नमुने दूषित
एप्रिलमधील चाचण्यांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५५ पाणी नमुने तपासण्यात आले होते. यातील ३१ दूषित आढळून आले असून, याची टक्केवारी ४.७ एवढी आहे.
दूषित पाण्याने रोगांचा धोका
दूषित पाण्यामुळे अनेक रोगांचा धोका संभवतो. टायफॉइड, कॉलरा, कावीळ, आमांश आणि इतर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या रोगांमुळे अतिसार, उलटी, पोटदुखी, ताप आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो.
रेड कार्ड ग्रामपंचायतींना सूचना
रेड कार्डद्वारे ग्रामपंचायतींना सूचना केली जाते. पाण्याची शुद्धता वाढवण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यास सांगितले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत औषधे पुरवली जातात, योग्य ते मार्गदर्शन केले जाते.
पाणी स्रोतांचे तपासणी अहवाल काय सांगतात ?
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तसेच पाणीसाठ्यांमध्ये टीसीएल टाकून वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतरच पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. एप्रिल महिन्यात जिल्हाभरातील ६५५ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील ३१ नमुने दूषित आढळून आले. गरजेनुरूप ग्रामपंचायतींना रेड कार्ड, यलो कार्ड आणि ग्रीन कार्ड दिले जाते. ग्रीन कार्ड मिळालेल्या पाण्याचे नुमने म्हणजे पाणी शुद्ध व पिण्यालायक असल्याचे निदेशक होय.