मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची उपस्थिती
कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन रविवार, ११ मे रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे, शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्गच्या अध्यक्षा नीलम राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित ही ‘गोवर्धन गोशाळा’ आहे. राज्यातील वेगळी अशी ही गोशाळा असून, येथे देशभरातील विविध प्रकारच्या गार्गीचे पालन केले जाणार आहे. या गोशाळेत गायीच्या दुधाचे फॅटही तपासले जाईल. गायी पाळणाऱ्यांकडून दूध संकलन करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.
या गोशाळेत शेण पाच रुपये किलो दराने विकत घेतले जाईल. त्यातून बायोगॅसची निर्मिती करण्यात येईल. स्थानिक गायींचे गोमूत्रही विकत घेतले जाईल. तसेच खताची फॅक्टरीही होणार आहे. शेणापासून रंगाची निर्मिती केली जाणार आहे. शेतीबरोबरच पूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.