अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
सिंधुदुर्गनगरी : तलाठी संवर्गातील भरतीमधील समांतर आरक्षणातील नियुक्तींची चौकशी करावी, तसेच खुल्या प्रवर्गात समांतर आरक्षणात भरती केलेल्या इतर उमेदवारांची नियुक्तीपत्रे रद्द करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,महसूल विभागात तहसीलदार कार्यालय कणकवली येथे कार्यरत असणारे संभाजी खाडे यांना १३ फेब्रुवारी २००६ च्या आदेशाने नियुक्ती दिलेली आहे. सदरचा नियुक्ती आदेश अनुकंपा तत्वाच्या आधारे देण्यात आलेला असून माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत सन २००४ ते २०१० या कालावधीतील अनुकंपा धारकांची यादी मागितली असता सदर यादीमध्ये खाडे यांचे नाव दिसून येत नाही. तसेच खाडे यांचा अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचा प्रस्ताव आढळून येत नाही. अशा प्रकारे प्रशासनाने माहिती दिलेली आहे. कोणत्याही शासकीय कर्मचारी याचा नियुक्तीचा आदेश व त्या संबंधित कागदपत्रे ही कायमस्वरूपी जतन करावयाच्या दस्तऐवजाच्या यादीत समाविष्ट आहेत .असे असतानाही श्री खाडे यांची नियुक्ती करावयाची कागदपत्रे ही नियमाप्रमाणे कायमस्वरूपी जतन करावयाची कागदपत्रे आहेत.
मात्र संबंधित कागदपत्रे जिल्हा व तालुका प्रशासनाकडून गहाळ झालेले आहेत. यावरून प्रशासकीय कामकाजात गंभीर स्वरूपाची अनियमितता दिसून येत आहे. सदरचे कृत्य हे फौजदारी स्वरूपाचे आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न मोठा असताना अशा प्रकारे बाहेरील जिल्ह्यातील उमेदवार गैरमार्गाने नोकरी मिळवत असून स्थानिक बेरोजगारावर अन्याय होत आहे. अलीकडे झालेल्या तलाठी संवर्गाच्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आलेली आहे .समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करताना खुल्या प्रवर्गावर अन्याय झाला आहे. सर्व सरकारी आस्थापना कडून नोकर भरती मध्ये जाणीवपूर्वक स्थानिकांना डावलून नोकर भरती केली जात आहे. याकडे आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून कणकवली तहसीलदार कार्यालय येथे कार्यरत असलेल्या संभाजी खाडे यांच्या नियुक्ती बाबत चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांना नेमणूक देणाऱ्या तत्कालीन संबंधित जिल्हाधिकारी यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तलाठी सुवर्गातील भरती मधील समांतर आरक्षणातील नियुक्तींची चौकशी करून खुल्या वर्गात समांतर आरक्षणात भरती केलेल्या इतर उमेदवारांची नियुक्तीपत्रे रद्द करण्यात यावीत. अशी मागणी आज मराठा महासंघाच्या वतीने देण्यात अलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन देताना मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, तालुकाध्यक्ष संतोष परब, सचिव वैभव जाधव यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.