संबंधितां विरोधात कारवाईची स्थानिकांची मागणी…
मालवण : शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला येथे असलेल्या शासकीय जमिनीत पर्यटकांकडून उभारण्यात येणाऱ्या वाहनांवर काही जणांकडून शुल्क आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय जमिनीत वाहने पार्किंग केली असतानाही बोगस पावत्यांचा वापर करून पर्यटकांची लूट करणाऱ्या या संबंधितांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी राजकोट वासियांनी केली आहे. राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याचे उद्घाटन झाले नसले तरी सध्याच्या पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने पर्यटक राजकोट किल्ला येथे शिवपुतळा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी शासकीय शेरे जमीन आहे. या जागेत पर्यटकांनी आपली वाहने उभी केली असता काही जणांकडून बोगस पावत्या करत पर्यटकांकडून पैसे घेतले जात आहेत. प्रत्यक्षात शासकीय जमिनीत वाहने उभी केली असतानाही पर्यटकांकडून चुकीच्या पद्धतीने शुल्क आकारणे ही गंभीर बाब आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधितांवर कठोर कारवाई करत पर्यटकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणीही राजकोट वासीयांनी केली आहे.