८० हजार रुपयांचा ऐवज व रोख ३ हजार केले लंपास
कणकवली : तालुक्यातील वायंगणी – बांबरवाडी येथे अज्ञात चोरट्याने अशोक गिडाळे यांच्या घराच्या मागील पडवीचा दरवाजाची कडी तोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली आहे. ही घटना गुरुवारी ७:३० वा. च्या सुमारास घडली.
अशोक गिडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अशोक गिडाळे हे गुरुवारी सकाळी वैभववाडी येथे गेले होते. त्यांची पत्नीही मंदिरात गेली होती.त्यावेळी त्यांचे घर बंद होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते दोघे घरी परतले. घराचा दरवाजा उघडून ते आत गेले. त्यावेळी बेडरूम मधील लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले आढळून आले. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता, त्यातील सोन्याचे दागिने व रोकड गायब झाल्याचे लक्षात आले. घराच्या पडवीच्या दरवाजाची कडी कोणत्या तरी हत्याराने तोडण्याचे दिसून आले. कपाटातील २२ ग्रॅमचा सोन्याचा हार,१५ ग्रॅमची सोन्याची चेन, एक सोन्याची अंगठी, कर्णफुले असा ८० हजार रुपयांचा ऐवज तसेच रोख ३ हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशोक गिडाळे यांनी पोलिस ठाण्यात या चोरीबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. तसेच घटनेचा पंचनामा देखील केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.