महायुतीच्या यशाबद्दल आभार यात्रेत मानले सिंधुदुर्गवासियांचे आभार
मोठ्या उत्साहात संपन्न झाली एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा
कुडाळ | मयुर ठाकूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. या कोकणवासियांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे. वंदन करायला आलो आहे. आपल्याला धन्यवाद द्यायला आलो आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीला विजयी करा हे आवाहन मी केले आणि ते आपण करून दाखवले. कोकणात विधानसभेच्या 15 पैकी 14 जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी भगवा फडकवला आणि हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या उबठाची मशाल कायमची विझवून टाकली. त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. असेच प्रेम शिवसेनेवर ठेवा असे आवाहन शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर झालेल्या आभार यात्रा सभेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गच्या जनतेने महायुतीला भरघोस मताधिक्य दिले. जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी शिवसेनेच्या दोन आमदाराना मतदारांनी कौल दिला. त्यामुळे या मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार यात्रेच्या माध्यमातून कुडाळ येथे आले होते. कुडाळ एसटी डेपो मैदानावर ही आभार यात्रा सभा झाली. पहेलगाम येथे अतिरेक्याचा हल्ला झाला. त्यात महाराष्ट्रातील पर्यटक मृत्युमुखी पडले. तसेच काही पर्यटक तिथे अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे बुधवारी रात्रीपासून काश्मीर मध्ये गेले होते. त्या ठिकाणाहून ते थेट गुरुवारी रात्री मोपा विमानतळावर उतरले. रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांचे सभास्थळी आगमन झाले. त्यावेळी त्यांचे शिवसनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आल्याबरोबर लगेच त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, बाळा चिंदरकर, संजय आंग्रे, दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, संजू परब, वर्षा कुडाळकर, ऍड. नीता कवीटकर, संजय पडते, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, दीप्ती पडते, सौ. साक्षी परब, अपूर्वा सामंत,अशोक दळवी, महेश कांदळगावकर, प्रेमानंद देसाई, संजू परब उपस्थित होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मी काश्मीरमध्ये लोकांच्या मदतीसाठी मध्ये गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्या लोकांना आपला माणूस आल्यासारखे वाटले. त्यांना धीर आला. विरोधक टीका करतात पण संकटसमई त्या ठिकाणी जायचे नाही तर मग कधी जायचे. तिकडे अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या. त्यांना विश्वास आला की आता आम्ही सुरक्षितपणे आमच्या घरी जाऊ शकतो. आणि तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप माघारी आणू शकलो. पहेलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा खरे म्हणजे हा कुठल्या व्यक्तीवर नाही देशावर झालेला हल्ला आहे आणि याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची भावना आहे. हा नवा भारत आहे. घुसके मारेंगे असे सांगून आर पार घुसवणारा भारत आहे. त्यामुळे या ठिकाणी जशास तसे उत्तर त्यांना पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोकण बद्दल बोलताना श्री. शिंदे म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आल्यासारखे वाटते. तसा अनुभव या ठिकाणी येतो आणि म्हणून हा भगवा इथे डौलाने फडकतो आहे. या भगव्यासाठी जान कुरबान करणारे कोकणातले शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत. आपले ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे. निलेश राणे हे फणसासारखे आहेत. बाहेरून कठोर दिसत असले तरी आतून प्रेमळ आणि गोड आहेत. शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून फक्त कामावर आणि विकासावर त्यांनी लक्ष दिलेला आहे. स्वाभिमानाने पेटून उठलेला आणि अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे. या कोकणामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. या कोकणवासियांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे. वंदन करायला आलो आहे. आपल्याला धन्यवाद द्यायला आलो आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीला विजयी करा हे आवाहन मी केले आणि ते आपण करून दाखवले. कोकणात विधानसभेच्या 15 पैकी 14 जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी भगवा फडकवला आणि हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या उबठाची मशाल कायमची विझवून टाकली. त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. कोकणातला माणूस हा फणसासारखा गोड असतो. पण उबाठा वरूनही काटेरी आणि आतूनही काटेरी. त्यामुळे कोकणच्या मतदारराजाने त्यांचा कायमचा काटा काढून टाकला. अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले.
राज्य सरकारने परवाच्या कॅबिनेटमध्ये देखील मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचे काम आहे आणि म्हणूनच लोकांचा सर्वांगीण विकास हे भविष्य नसून आता आपल्याला ते वर्तमानात बदलायचे आहे. सगळीकडून या शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू आहे. खऱ्या अर्थाने शिवसेना दिलेला शब्द पाळते आहे. बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेते आहे.
आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे. मच्छिमार, शेतकरी, बागायतदार यांचा फायदा झाला पाहिजे. हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोकणी माणसाने आता आपल्या कोकणाचे देखील मार्केटिंग आणि ब्रँडिंग करायला शिकले पाहिजे. कोकणात आलेला माणूस पर्यटनासाठी पुन्हा पुन्हा आला पाहिजे यासाठी आपण काम केले पाहिजे. त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून या लाल मातीमध्ये प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे आहेत. आज कोकणामध्ये आपण कोस्टल रोडचे काम सुरू केले आहे. रेवस ते रेडी महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे समृद्धी येतील असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
आपल्याला आता संघटना वाढवायची आहे. शिवसेना वाढवायची आहे. घराघरात शिवसेना वाढवण्याचे काम या ठिकाणी झाले पाहिजे. त्यासष्ठी निलेश राणे प्रयत्न करीत आहेत त्यासाठी मी निलेश राणेचा मनापासून अभिनंदन करतो. आज मला सभास्थाली पोहोचणे कठीण होते. परंतु निलेश राणेचे प्रेम आणि त्याचा आग्रह एवढा मजबूत होता की मी येथे उशिरा का होईना पोहोचलो. असे सांगून त्यांनी निलेश राणे, उदय सामंत या सर्वांचे कौतुक केले. पुढच्या वेळेस येईन तेव्हा तुम्ही बोलवाल त्या वेळेच्या अर्धा तास अगोदर येईन असा विश्वास त्यांनी सर्वाना दिला.
उदय सामंत म्हणाले, निलेश राणे आपण आपला कार्यभार चालवावा. पण काही लोकांची अतिशय वाईट प्रवृत्ती असते. पण भविष्याच्या कालावधीमध्ये नियती त्याला माफ करणार नाही. कार्यकर्ते तर करणारच नाहीतच. परंतु नियती देखील त्यांना माफ करणार नाही. अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण हे सिंधुदुर्ग आणि कोकणने कधी बघितलं नव्हते. काही संबंध नसताना काही गोष्टी घडवायच्या. एखादी दुर्घटना घडल्यानंतर एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याला थेट निलेश राणेंचा संबंध जोडायचा, हे राजकारण कार्यकर्ते थांबवण्यासाठी जर कोण करत असतील तर आज या सभेला तुम्ही उत्तर दिलेला आहे. जेव्हा निलेश राणे यांची तिकीट फायनल झाले उमेदवारी फायनल झाली तेव्हा शिंदे साहेब निलेश राणे यांना म्हणाले, मला तुझ्याकडून काहीच नको फक्त एक शब्द पाहिजे. एकनाथ शिंदे वडिलांप्रमाणे तुझ्या पाठी ठामपणे उभा राहील. परंतु एकाच गोष्ट करायची, आज पासून संयम ठेवायचा आणि जर संयम ठेवलास तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून शंभर टक्के तुझं कर्तृत्व उदयाला येईल. निलेश राणे यांनी देखील, शिवसेनेला सोडाच पण तुम्हाला दुःख वाटेल असं पुढचं काम निलेश राणे करणार नाही, असे वचन दिले. त्यांचा स्वभाव परखड आहे ते ज्याच्या मागे उभे राहतात ताकदीने उभा राहतात. हा अनुभव मी देखील घेतलेला आहे. एमआयडीसी तुन ५० कोटी निलेश राणे यांना देणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठला मोठा पक्ष असेल तर तो दीपक केसरकर आणि निलेश राणे यांचा शिवसेना पक्ष आहे. सर्व प्रकारचा निधी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गसाठी देतील. निलेश राणे हे राजकीय परिपक्व असल्याचे सांगून उदय सामंत यांनी निलेश राणे यांचे कौतुक केले.
निलेश राणे म्हणाले, पाच महिने आम्ही इथे ठिकाणी मेहनत घेतली, जे काय कष्ट घेतले, पक्ष उभा केला. गावागावामध्ये इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष लोक बांधतायत? हा जर पक्ष बांधला गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही. असा पक्ष आम्ही इकडे उभा केला. आज टीका चारी बाजूंनी होते. कुठल्यातरी जुन्या केसेस काढल्या जात आहेत. काही पत्रकार आहेत ते पण याला खतपाणी घालत आहेत. जुन्या केसेस काढताना कसातरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे, कशी तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे. पण किती जरी बदनाम केलात तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्हाला आज या व्यासपीठावरून विश्वास देतो. विरोधक माझ्यावर टीका करतात. पण मला इकडे परत पराभूत करण्यासाठी २५ वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही. या जिल्ह्यातून तरी होणार नाही. कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहित नाही. पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थिती ठेवणार नाही एवढे विरोधकांनी लक्षात ठेवावं.
आम्ही लोकांसाठी खस्ता खाल्लेल्या आहेत. कोणी सांगितलं स्वतःला बदल, तेही केलं. कशासाठी माझ्या सिंधुदुर्गासाठी. या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला चांगले दिवस दाखवले. करायचं तर त्यांच्यासाठी करायचं आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोवर करणार. सिंधुदुर्गासाठीच करणार. ह्या निलेश राणेला दहा वर्षाच्या वनवासानंतर जर कोणी जिवंत केलं असेल तर माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने ठेवले आहे. मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला, दहा वर्षाच्या काळानंतर कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसेन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही. आज खर तर भाषण शिंदे साहेबांच्या समोरच करायचं होतं, पण जोपर्यंतउदय सामंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही. माझा शब्द न शब्द हा शिंदे साहेबांपर्यंत तुम्ही शंभर टक्के पोहोचवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे. माझ्या बंधू सारखे आहात. मी या सरकारमध्ये दुसरा कोणालाच फोन लावत नाही. मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो. बाकी कोणाला फोन लावत नाही. कधी कोणाकडे जात नाही. मदत मागितली तर या माणसाकडे मागतो. काय विचारायचं झालं तर या माणसाला विचारतो. दुसरा कोणाकडे जात नाही. कधी जायची गरजच पडली नाही. म्हणून सामंत साहेब असाच प्रेम आमच्यावर ठेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा.
दत्ता सामंत म्हणाले, येथील जनतेचा आशीर्वाद आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी कायमचा राहिला पाहिजे. कारण महाराष्ट्र मध्ये कुठल्याही जिल्ह्यांमध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये निलेश राणे गेले तर हजारो संख्येच्या माध्यमातून कुठल्याही जिल्ह्यामध्ये सभा घेऊ शकतात. अशी ताकद मुंबई ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. एक दमदार असा कार्यकर्ता शिवसेनेला मिळालेला आहे. शिवसेना ही एक नंबर करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शिवसेना भक्कम करण्यासाठी निलेश राणे यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी दत्ता सामंत यांनी केले. त्यांना मंत्रिपद मिळाले तर 2029 च्या निवडणुकीत शिवसेनेला अजून यश मिळेल, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, महाराष्ट्राचे लाडके भाऊ ज्यांनी सांगितलं की सीएम या शब्दाचा अर्थ चीफ मिनिस्टर नसतो तर सीएम म्हणजे कॉमन मॅन असतो आणि जे आता डीसीएम म्हणजे उपमुख्यमंत्री असताना दाखवून देत आहेत की डीसीएम म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर नसतो तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन असतो. आज येथे आपण वाट बघतोय, पण या महाराष्ट्राचा सुपुत्र छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे साहेब आहेत. दहशतवाद्यांनी हल्ला जरी केला तरी या महाराष्ट्रातल्या लोकांना सोडवण्यासाठी त्या काश्मीरच्या भूमीवरती झुंजत आहेत. कष्ट करतात. एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्याला सुद्धा मानाचा मुजरा असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी संजय पडते, अपूर्वा सामंत, बाळा चिंदरकर, दिपलक्ष्मी पडते, अशोक दळवी, प्रेमानंद देसाई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. उबाथ सेनेतून सुमारे दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विविध रंगी गीत सादर करण्यात आली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे कार्य अधोरेखित करणारे व्हिडीओ दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन राजा सामंत यांनी केले.