15.4 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी गावागावांत सदस्य नोंदणी करा : उदय सामंत

आरोप-प्रत्यारोपांवर मात करून आ.निलेश राणे अधिक जोमाने काम करतील

कणकवली : शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले पाहिजेत. योग्य नियोजन केले तर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होईल. गावागावात सदस्य नोंदणी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवास सवलत यांसारखे अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे सदस्य नोंदणीसाठी पोहोचलं पाहिजे. महिला या अभियानात नक्कीच सहभागी होतील. कुडाळ – मालवण मतदारसंघात आ. निलेश राणे, सावंतवाडी मतदारसंघात आ. दीपक केसरकर यांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

कणकवली येथील सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, रुपेश पावसकर, युवा जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, भूषण परुळेकर, शरद वायंगणकर, संदेश पटेल, प्रिया टेंबकर, दामू सावंत, फोंडाघाट सरपंच संजना आंग्रे, मधुकर सावंत, बाळू पारकर, सुनील पारकर, भास्कर राणे, विलास साळसकर, विश्राम सावंत, श्रेयस राणे, प्रभाकर चव्हाण उपस्थित होते.

पुढे श्री. सामंत म्हणाले, निलेश राणे, दीपक केसरकर जेव्हा आमदार झाले तेव्हापासून शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले दिवस आले आहेत. प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचे स्वतंत्र आहे. शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, अशी ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली पाहिजे. इतिहासात पहिल्यांदा देवगड नगरपंचायत शिवसेनेनं जिंकली आहे. निधी बाबत कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी बोलून निधी बाबत असलेला प्रश्न नक्कीच सोडवू.

५० सभासद नोंदणी करायची शपथ घेऊन सर्वांनी पुढे चालायचे आहे. सभासद नोंदणीत रत्नागिरी जिल्हा चार नंबरवर असला तरी पुढील पंधरा दिवसांत एक नंबरवर असणार आहे. पालकमंत्री म्हणून मी जनसामान्य लोकांच्या घरापर्यंत न जाता शिवसैनिक म्हणून जाणं गरजेचं आहे. आपले जिल्हापरिषद, पंचायत समिती, यासह प्रभागनिहाय काम केले तर, सदस्य नोंदणी करणं सहज शक्य आहे. आपण पक्षाचं काम किती करतो हे पडताळलं पाहिजे. काम करून संघटना वाढवायची आहे. संघटनेसाठी जे काय करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे. मित्रपक्षासह मला पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांचा आदर आहे. काही गोष्टी गैरसमजातून होत असतात. त्यामुळे गैरसमजांकडे लक्ष देऊ नका. आपण संयमानं काम केलं पाहिजे. आ. निलेश राणेंनी स्वभावात बदल केला आहे. ते ज्या पद्धतीने संघटनात्मक काम करत आहेत एक दिवस त्यांचाही येईल. आम्हाला २५ वर्षात विधिमंडळात जाऊन ज्या ताकदीने भाषण करता आले नाही त्या ताकदीने अगदी मुद्देसूद भाषण आमदार निलेश राणे विधीमंडळात करतात.

कुडाळ येथे होणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा हजारोंच्या उपस्थितीत झाली पाहिजे. महायुती मधून ज्या जागा मिळतील त्या सर्व जागा आपण जिंकायच्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी केले.

उपनेते संजय आंग्रे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्त्यांकडे अतिशय बारीक लक्ष असतो. सध्या आपल्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही. विकास कामांत देखील प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे कोणीही मागे हटू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काम करा. काम करत असताना काही अडचणी निर्माण झाल्या तर नक्कीच कळवा तात्काळ निर्माण झालेली अडचण सोडवली जाईल.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, २०२४ ची विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याला दोन आमदार शिवसेनेचे मिळाले आहेत. कुडाळमध्ये भाजप पक्ष सर्वात श्रेष्ठ होता. त्यामुळे कणकवली मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकत्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना बळ दिले पाहिजे. भाजपने देखील कणकवली मतदारसंघात मित्रपक्षाला वाटा दिला पाहिजे. त्यामुळे त्या – त्या स्तरावर कामे होऊ शकतात. कुडाळमध्ये ८० पेक्षा जास्त ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत. तर १३३ सरपंच आहेत. २४ एप्रिलला होणारा शिवसेनेचा मेळावा तोलामोलाचा होणार आहे. महायुतीला संघटीत करण्याचं काम मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून होईल. खासदार नारायण राणे यांच्या पराभवानंतर पहिल्या फळीतील काही लोक सोडून गेले. अशा पडत्या काळात आम्ही जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला होता. एवढी शिवसेनेची ताकद आजही आहे. यानंतर संघटना वाढीसाठी ज्याची गुणवत्ता असेल त्यालाच सन्मान मिळेल. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत दीड हजारपेक्षा जास्त उबाठा सेनेतील लोक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.

बॉक्स :

चांगलं काम केलं की शत्रू वाढतात – मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. परंतु एखादी व्यक्ती चांगलं काम करायला लागल्यानंतर त्या व्यक्तीचे राजकीय शत्रू वाढतात, अशी परिस्थिती कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या बाबतीत होत आहे. अतिशय प्रामाणिकपणे आमदार निलेश राणे त्यांच्या मतदारसंघात काम करत आहेत. अन्यायाची चीड असल्यामुळे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या मागे आमदार निलेश राणे उभे राहतात. ज्यांना हे नको आहे, त्यांना आरोप प्रत्यारोप केल्यानंतर आ. निलेश राणेंच्या कामाची स्पीड कमी होईल, असे वाटते. परंतु अशा प्रत्यारोपांमधून आ. निलेश राणे अजून ऊर्जा घेतील आणि जोमाने काम करतील, अशी आम्हाला खात्री आहे, असे ना.सामंत म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!