दोडामार्ग : येथील धाटवाडी परिसरात धर्मांतरण करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्म प्रवर्तन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली सभा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावली. गोवा डीचोली येथून आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिस अधिनियम ३८/१३६ अन्वये पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग धाटवाडी येथे गोवा डीचोली येथील ख्रिस्ती धर्माची लोक येऊन हिंदू धर्मातील लोकांना धर्मप्रवर्तन करण्याची सभा घेत असल्याची माहिती हिंदूवादी संघटना दोडामार्ग यांना मिळाली. त्यांनतर दोडामार्ग हिंदुत्ववादी संघटनेचे काही पदाधिकारी धाटवाडी येथे गेले. त्यावेळी धर्म परिवर्तन सभा सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती दोडामार्ग पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे आपल्या सहकाऱ्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हिंदू संघटनेने त्या धर्मातरण करणाऱ्या लोकांचे सामान पोलिसांच्या ताब्यात देत सदरची सभा उधळून लावली. यावेळी दोडामार्ग हिंदू संघटनेचे वैभव ईनामदार, दीपक गवस, पराशर सावंत, वैभव रेडकर, समीर रेडकर, राजेश फुलारी आदी उपस्थित होते.