जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न…
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीअंतर्गत देण्यात येणारा निधी अखर्चित राहता कामा नये. जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च व्हावा याला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीची जिल्हा नियोजन समितीची बैठक श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार आहे. हा निधी कुठे , किती आणि कशा प्रकारे खर्च केला जाईल यावर लक्ष असणार आहे. कामांच्या बाबतीत कोणाचीही तक्रार येता कामा नये. आपला जिल्ह्याचा दरडोई उत्पन्नात पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावर्षी निधीचे योग्य नियेाजन करण्यात येईल. जलजीवनची निकृष्ट कामे केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी माजिक संस्थांची मदत घेण्यात येईल. आजारी प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी वनतारा सारख्या संस्थेची मदत घेऊन काम करणार आहोत. वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोबत बैठक झाली असून गुजरात वनविभाला पत्रव्यवहार केला जात आहे. लवकरच हत्तीं आणि इतर वन्यप्राण्यांचा त्रास संपेल, अशी माहिती राणे यांनी दिली.
पुढे पालकमंत्री म्हणाले, प्रशासनाच्या कामात आता कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्थेशी बोलणी सुरू असून जिल्ह्याच्या विकासात तंत्रज्ञानाची महत्वाची मदत होणार आहे असेही ते म्हणाले. खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाय, म्हैस तसेच शेळी अशा दुभत्या जनावरांचे वाटप करा जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने राष्ट्रीय महामार्ग ते समुद्र किनारा यादरम्यानच्या रस्त्यांची रुंदी वाढवावी, यामध्ये विशेष करुन मालवण, वेंगुर्ला, देवगड तसेच आंबोली या रस्त्यांचा समावेश करावा. तसेच जिल्ह्यात लोकमान्य टिळकांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारावा, जागतिक दर्जाचे उद्यान उभारावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.