सिंधुदुर्गनगरी : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी वाहनांमधून मालवाहतूक होऊ नये, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खासगी बसची तपासणी केली जात आहे. ५ व ६ एप्रिल रोजी आरटीओच्या माध्यमातून इन्सुली तपासणी नाका आणि ओसरगाव टोल नाका येथे ९१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणाऱ्या २० वाहनांवर तब्बल २ लाख १० हजार रुपये एवढी दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून काही वेळा मालवाहतूक केली जाते. त्यामुळे काही वेळा अपघात घडतात. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयाने ५ व ६ एप्रिल २०२५ या कालावधीत इन्सुली तपासणी नाका आणि ओसरगाव टोल नाका येथे खासगी बसेसची तपासणी केली.
५ एप्रिल रोजी इन्सुली तपासणी नाका येथे २३ बस तपासण्यात आल्या. यात ५ बस वर ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच ६ एप्रिल रोजी इन्सुली तपासणी नाका येथे १४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात २ वाहनांना २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तर ओसरगाव टोल नाका येथे वायुवेग पथकामार्फत ५४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात १३ वाहनांना १ लाख ४० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तर या दोन दिवसांत एकूण ९१ वाहनांची तपासणी करून २० वाहनांकडून २ लाख १० हजार रुपयांचा दंड आरटीओ कार्यालयाने आकाराला आहे. ही कारवाई मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, विनोद भोपळे, रत्नकांत ढोबळे, संदीप भोसले यांचा समावेश आलेल्या टीमने ही कारवाई केली.