कुडाळ : कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे. सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव – कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे कुडाळ पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते रामेश्वर प्रसाद अपार्टमेंट, केळबाई वाडी, कुडाळ येथे एकटेच राहत होते. आज दुपारच्या सुमारास आत्महत्येपूर्वी त्यांनी मळगाव येथील त्यांच्या मित्राला मोबाईलवर मेसेज करून जीवन संपवत असल्याचे सांगितले. मित्राने ताबडतोब ही गोष्ट त्यांच्या भावाच्या कानावर घातली. यानंतर भावानेच लगेचच चारचाकीने कुडाळ येथील त्यांचे घर गाठले. यावेळी घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी लगेच कुडाळ पोलिस स्थानक गाठत कुडाळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
पोलिसांना ही बातमी कळताच पोलिसांनी ताबडतोब कुडाळ येथील सूरज यांचे राहते घर गाठले. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करताच सूरज यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी भेट देत पाहणी केली असून याबाबतचा अधिक तपास पोलिस अंमलदार देवानंद माने करत आहेत.
सूरज यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पुतण्या, पत्नी, लहान मुलगा असा परिवार असून या घटनेमुळे पवार कुटुंबासह मळगाव – कुंभार्ली गावावर शोककळा पसरली आहे.