13 C
New York
Wednesday, April 16, 2025

Buy now

डंपरचा फाळका तुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी विखूरली

बांदा : विलवडे येथील काळ्या दगडाच्या खणीतून दगडाची वाहतूक करणाऱ्या डंपरचा फाळका तुटल्याने बांदा वाफोली रस्त्यावर निमजगा प्राथमिक शाळेजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी विखूरली गेली. सुदैवाने वाहनांची वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली. स्थानिक युवकांनी खडी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. काही दिवसांपूर्वी वाफोली येथे ओव्हरलोड वाहतूक करताना खडी रस्त्यावर विखूरल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत वाहतूक रोखली होती.
आज सायंकाळी ही घटना घडली. बांदा दाणोली मार्गावर विलवडे येथे मोठ्या प्रमाणात काळ्या दगडांच्या खाणी असून या खाणीतून राजरोसपणे गोवा येथे दगडांचे वाहतूक करण्यात येते. डंपर मधून होणारी वाहतूक ही क्षमतेपेक्षा जास्त असल्याने बऱ्याच वेळा खडी रस्त्यावर विखुरली जाते. 5 मार्च रोजी अशाच पद्धतीने होणारी खडी वापोली येथे रस्त्यावर विखुरल्याने वाघोली ग्रामस्थ आक्रमक झाले होते रस्त्यावरील डंपर वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली होती. दोन दिवसानंतर क्रशरमालक, खडी व्यावसायिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन तोडगा काढण्यात आला होता.
डंपर मधून खडीची ओव्हरलोड वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच क्षमतेपेक्षा जास्त खडीची वाहतूक केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खाणमालकांची राहील. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महसूल प्रशासनाने दिला होता. मात्र काही दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा ओव्हरलोड खडी वाहतूक करण्यास प्रारंभ झाला.
आज सायंकाळी बांदा वाफोली रस्त्यावर निमजगा प्राथमिक शाळेच्या समोर ओव्हरलोड वाहतूक करताना डंपरचा फाळका तुटल्याने खडी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखुरली गेली. मात्र सुदैवाने यावेळी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावर विखुरलेली खडी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
डंपर मधून होणाऱ्या ओवरलोड खडी, दगड वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकातून होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!