सलग दुसऱ्या वर्षी रामनवमी निमित्त मध्यप्रदेश टिकमगढ येथे आमंत्रण
कणकवली : एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या ६ एप्रिल रोजी २१७वे वादन करण्यासाठी रवाना झाले आहे. यापुर्वी सिंधुगर्जना पथकाने ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या वादनाने ठसा उमटविला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा, दिल्ली प्रजासत्ताक दिन परेड यांसारख्या कार्यक्रमांमध्ये विशेष आमंत्रित म्हणून सहभागी झाले आहे. सिंधुगर्जना पथकाने गतवर्षी आपल्या नावावर विश्वविक्रमाची नोंद देखील केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सिंधुदुर्गातील ५० स्त्री पुरुष कलाकारांच्या संचात सिंधुगर्जना पथक मध्यप्रदेश मध्ये जाऊन वादन करणार आहे.