पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या प्रयत्नांना यश
कणकवली : शहरातील विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या नेपाळी तरूणाला कणकवली पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी ही कारवाई केली. यात पन्नास हजाराच्या रोख रक्कमेसह एक लाखाचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. कणकवलीतून उत्तरप्रदेश मार्गे नेपाळला जाण्याच्या प्रयत्नात असताना नेपाळी तरूणाला पनवेल स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण हे पाडव्यानिमित्त ३१ मार्च रोजी कणकवली बाजारपेठेत खरेदीसाठी गेले होते. त्या मुदतीत त्यांच्याकडेच कामगार असणारा रणजित पैसवाल (वय २८) या तरूणाने त्यांचा फ्लॅटचे कुलूप तोडून घराच्या कपाटातील रोख ५० हजार आणि सोन्याचे दागिने लंपास केले होते. जाताना चव्हाण यांची दुचाकी देखील चव्हाण याने लांबवली होती. श्री.चव्हाण यांनी याबाबतची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात देताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा फोटो किंवा मोबाईल क्रमांक,त्याचा राहण्याचा पत्ता अशी कोणतीही माहिती नसताना चातुर्याने त्याचे मोबाईल क्रमांक गोपनीय माहितीगाराकडून प्राप्त करून त्याचे लोकेशन घेऊन व सीसीटीव्ही मधून त्याचे छायाचित्र प्राप्त केले.तदनंतर आरोपी हा पनवेल रेल्वे स्थानक या ठिकाणी असलेबाबत त्याचे मोबाईल लोकेशनद्वारे समजल्याने तात्काळ कणकवली रेल्वेचे पोलीस निरीक्षक श्री. सुरवडे यांचे मदतीने पनवेल रेल्वे पोलिसांची मदत घेऊन आरोपी नेपाळ येथे पळून जाण्याचे तयारीत असतानाच त्याला रेल्वे पोलिसांचे मदतीने संयुक्त कारवाई करून पनवेल रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणले.पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने (सोन्याची कुडी,दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख रक्कम हे हस्तगत करण्यात आले. तपासामध्ये त्यांनी चोरून नेलेली मोटरसायकल ही देखील ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलीस करीत आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद सुपल हे करीत आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक श्री कृषिकेश रावले, पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार विनोद सुपल, राजाराम पाटील, प्रशांत पाटील यांनी केली आहे.