कुडाळ: एमआयडीसी येथे पाण्याच्या टाकी समोरच्या कंपनीत परप्रांतीय व्यक्तींचा वावर सुरू आहे तसेच बेकायदेशीर कृत्ये होण्याची शक्यता आहे, रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी लोकांची वर्दळ असते तरी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्षांनी निवेदनाद्वारे केली होती; त्यानुसार आम्ही त्या कारखान्याची झडती घेतली मात्र आम्हाला कोणतीही अनधिकृत हालचाल आढळून आली नाही, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
दरम्यान कुडाळ परिसरातील १५ संशयित आमच्या रेकॉर्डवर आहे. त्याशिवाय अंमली पदार्थ विरोधी पथक आम्ही तयार केले आहे. काहीही झाले तरी अंमली पदार्थांच्या बाबतीत आमच्या कडून कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. आमची पोलिस यंत्रणा अंमली पदार्थ मोहीम मोडीत काढण्यासाठी सज्ज आहे असेही श्री. मगदूम यांनी स्पष्ट केले.
कुडाळ एमआयडीसी येथे अंमली पदार्थ विक्रीचा स्पाॅट बनत आहे, परिणामी कुडाळ व पिंगुळीचे नाव नाहक बदनाम होत आहे. याकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप मनसे जिल्हा ध्यक्ष धीरज परब यांनी केला. याबाबत कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांनी एमआयडीसी मधील त्या कंपनीच्याच्या मॅनेजरचा जवाब नोंदवून घेतला आहे. त्यांच्याकडे आता तेरा कामगार असुन बहुतांशी कामगार हे उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. त्या सर्व कामगारांच्या नोंदी आमच्याकडे आहेत. त्या कारखान्याचा मालक हा गोव्याचा रहिवाशी आहे. संशयित हा कुडाळचा रहिवासी आहे. कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये ८० टक्के परप्रांतीयांच्या नोंदी आहेत. गोवा हद्दीत अडीचशे ग्रॅम अमली पदार्थ नेताना पकडण्यात आलेला परवेज खान हा संशयित आरोपी पिंगुळी येथे राहत आहे. तो गेली ३५ वर्ष वेंगुर्ला येथे आई-वडिलांसह राहत होता. आता गेल्या पाच वर्षापासून पिंगुळी येथे राहत आहे. २८ मार्चला ईद निमित्त कपडे खरेदी करण्यासाठी तो गोव्याला गेला, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही माहिती आपल्याला कळाली. संशयित व्यक्ती पिंगुळी मधील असल्यामुळे त्यांच्या तपासासाठी पीएसआय श्री. कराडकर यांची नेमणूक केली. त्या तपासात स्थानिक हर्षद गावडे नामक एका युवकाची माहिती मिळाली. विक्रोळी मध्ये सुद्धा हर्षदचा फ्लॅट आहे. २८ मार्चला तो मुंबईहून नेत्रावती एक्सप्रेसने कुडाळ मध्ये आला. त्याने आणलेला अमली पदार्थ परवेज खानकडे दिला आणि त्या अमंली पदार्थाचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि गोव्याच्या नार्कोटेसच्या पथकाला तो सापडला. तरी सुद्धा त्या अमंली पदार्थाची निर्मिती या ठिकाणी होते असं म्हणता येणार नाही, असे श्री. मगदूम म्हणाले.
अमंली पदार्थ तस्करी हे पोलिसांसमोरचे, पर्यायाने समाजासमोरचे फार मोठे संकट आहे. आम्ही आल्यापासून अमली पदार्थ विरोधात मोहीम सुरू केलेली आहे. आमच्या रेकॉर्डवर कुडाळमधील १५ संशयित टारगेटवर आहेत. आमच्या रेकॉर्डवरील असलेल्या सर्व आरोपीची संपूर्ण माहितीची नोंद आमच्याकडे आहे. कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये आम्ही अंमली पदार्थ विरोधी पथक तयार केले आहे.या प्रकरणी मनसेने तशी कोणतीही अधिक माहिती पोलिसांना दिली नाही. आम्ही केलेल्या कारवाईचे पत्र नोव्हेंबर मध्ये मनसेला दिलेले होते. आमच्या कारवाईने त्यांचे समाधान झाले नसते तर ते माझ्या वरिष्ठांकडे गेले असते. पण काहीही झाले तरी अंमली पदार्थांच्या बाबतीत आमच्या कडून कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. आमची पोलिस यंत्रणा अंमली पदार्थ विरोधी मोहीम मोडीत काढण्यासाठी सज्ज असल्याचे श्री. मगदूम यांनी सांगितले.