कणकवली : सिंधुदुर्ग ही अनेक कला आणि कलाकारांची खाण आहे. इथे प्रत्येक घरात कलाकार जन्माला येतो. अनेक संस्था आणि मंडळे अतिशय मनापासून या कला जोपसण्यासाठी जीवापाड झटत असतात. त्यांच्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. त्याचा कलाकारांनी लाभ घ्यावा असे, आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल हॉल येथे १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, लोक कलावंत तथा प्रा हरिभाऊ भिसे, अक्षरसिंधुचे अध्यक्ष संजय राणे आणि संयोजक विजय चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत झाला.
मुख्याधिकारी गौरी पाटील म्हणाल्या की, आपल्याला व्यापामुळे नाट्य प्रशिक्षण घेता आले नाही. पण नाटकाची खुप आवड आहे. तुमच्यासारखे प्रशिक्षण मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता.
जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर म्हणाले, सिंधुदुर्ग आता शूटिंग हब बनलेय. दरदिवशी अनेक सिनेमा, सिरीयल, वेब सिरीज यांचे शूटिंग सुरु आहे. त्यांना स्थानिक कलाकार हवे असतात. या प्रशिक्षणमधून तयार झालेलांना नाट्य क्षेत्रात करिअर संधी आहे. वामन पंडित म्हणाले, विजय चव्हाण यांच्या प्रयत्नातून शासनाने मंजूर केलेले हे प्रशिक्षण सिंधुदुर्गातील नवोदित कलाकारांसाठी सुवर्णसंधी आहे. प्रत्येकामध्ये एक कलाकार दडला आहे त्याला व्यक्त व्हायला द्या. विजय चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करून प्रशिक्षणचे स्वरूप विषद केले. प्रास्ताविक प्रा हरिभाऊ भिसे यांनी केले. सूत्रसंचालन संजय राणे यांनी केले. यावेळी विवेक वाळके ऋषीकेश कोरडे, श्रद्धा परब, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
दिग्गजांचे मार्गदर्शन
दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात दिग्गजांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नाट्यकर्मी भालचंद्र कुबल, संभाजी सावंत, निखिल हजारे, रामनाथ थरवळ, वामन पंडित, डॉ. राजेंद्र चव्हाण, सुहास वरुणकर, केदार सामंत, केदार देसाई, पूर्वा पंडित, किरण कदम, नीता सावंत, प्रा. हरिभाऊ भिसे, निलेश पवार, विवेक वाळके, किशोर कदम यांचा समावेश आहे.
मुलींची लक्षणीय उपस्थिती
नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना नाटकाच्या तंत्राचा अभ्यास व्हावा, योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी हे नाट्य प्रशिक्षण शिबिर १२ ते २१ मार्च या कालावधीत कणकवली महाविद्यालयाच्या एसपीसीएल येथे होते आहे. शिबिराला प्रतिसाद मिळाला असून सांगली, गोवा, देवगड, कवठी, माणगाव व ग्रामीण भागातून शिबिरार्थी सहभागी झाले असून मुलींची संख्या लक्षनीय आहे.
अधिकाऱ्यांच्या नियोजनाखाली शिबिर
रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतून सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभाग सचिव अपर मुख्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.