सिंधुदुर्गनगरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या तब्बल १२० हून अधिक कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने अद्याप पर्यंत मानधन मिळालेले नाही. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर एवढ्यात पगार मिळणार नाही तुम्ही काहीही करा, असे संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात करायचे तरी काय? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तरुण- तरुणी त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी २० हजार इतके मानधन देण्यात येत होते. मात्र, सहा महिन्यापूर्वी त्या मानधनात कपात करून १८००० इतके मानधन देण्यात येत आहे. दरम्यान गेले दोन महिने हे मानधन संबंधित ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलेले नाही. दोन महिने पगार न झाल्यामुळे अन्य गावातून व तालुक्यातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. एसटी प्रवास त्याचबरोबर डब्याचा खर्च खर्च लक्षात घेता आता करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
दरम्यान याबाबत ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा केल्यानंतर पगार मिळणार नाही, असे थेट सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करून उपयोग काय ? असा सवाल संबंधित तरुण – तरुणींकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सशासन व रुग्णालय प्रशासन याबाबत योग्य ती भूमिका घेणार का, याकडे लक्ष लागून राहीले आहे.