कणकवली – नांदगाव येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यातील धडकेत दुचाकीस्वाराला पाय जायबंदी झाला. हा अपघात रविवार ५.४५ वाजण्याच्या सुमारास नांदगाव तिठा येथे झाला. अपघातात उमर इमान नावलेकर (७०, रा. नांदगाव तिठा) यांचा डावा पाय जागेवरच पूर्णतः तुटला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक सीताराम अनंत डगरे (रा. असलदे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव तिठा येथे रविवारी उमर नावलेकर हे आपली दुचाकी (एमएच ०७ एसी ९९५२) उभे होते. त्यावेळी फोंडाहून देवगडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (एमएच ०९सीए ०४८८) ने समोरून धडक दिली. या धडकेत उमर हे दुचाकीसह ट्रकच्या पुढील चाकाखाली गेल्याने त्यांचा डावा पाय जागेवरच पूर्णतः तुटला. घटना घडताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले. तातडीने अपघातग्रस्त उमर यांना तातडीने रुग्णवाहिकेतून चालक पांडू तेली, खुदउद्दीन हमीद नावलेकर व त्यांचा मुलगा यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोड वाहने वळतात, तेथेच झाल्याने दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी खुदउद्दीन हमीद नावलेकर (५३, रा. नांदगाव तिठा) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सीताराम डगरे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २८१, १२५ (अ), १२५ (बी), १८४ नुसार गुन्हा दाखल झाला.