कामात अटकाव करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
कणकवली : तालुक्यातील वाघेरी गावात आपल्या जमिनीतील ग्रामपंचायतीने उभारलेला जीर्ण कोंडवाडा जेसीबी लावून पाडला. हे काम सुरू असताना वाघेरी गावचे माजी सरपंच, माजी पोलीस पाटील यांच्यासह अन्य तिघांनी या कामात अटकाव केला. गैरकायदा जमाव करून धमकी दिली अशी फिर्याद वैशाली पाटील यांनी आज येथील पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैशाली पाटील (वय ५१, रा.बावशी शेळीचीवाडी) यांनी आज कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये ग्रामपंचायतीने अनेक वर्षापूर्वी बेकायदेशीरपणे कोंडवाडा बांधला होता. हा कोंडवाडा जीर्ण झाल्याने तो आज जेसीबी मशिनच्या साहाय्याने पाडण्यात आला. हे काम सुरू असताना वाघेरीचे माजी सरपंच संतोष राणे, माजी पोलीस पाटील अनंत राणे, तसेच विद्यमान उपसरपंच आणि अन्य दोघांनी तेथे येथून कामास अटकाव केला. जेसीबी चालकाला काम थांबव अन्यथा जेसीबी फोडून टाकू अशी धमकी दिली. जेसीबी चालकाने जेसीबी जमिनीच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला असता, जेसीबी काढण्यास अटकाव केला. तसेच गैरकायदा जमाव करून आपणास धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वैशाली पाटील यांच्या तक्रारीनंतर कणकवली पोलिसांनी संतोष राणे, अनंत राणे यांच्यासह अन्य तिघांविरोधात गैरकायदा जमाव करणे, धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.