सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तिरुवनंतपुरम येथील इस्रो आणि टेक्नोपार्कला भेट दिली. इंडस्ट्रियल व्हिजिट उपक्रमांतर्गत आयोजित या भेटीत ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी इस्रोच्या थुंबा प्रकल्पाला भेट देत भारताच्या अंतराळ मोहिमा आणि रॉकेट तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली. केरळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालयाला भेट देत संगणक उत्क्रांतीची माहिती घेतली. तसेच अत्याधुनिक टेक्नोपार्कला भेट देत टीसीएस, इन्फोसिस अशा कंपन्यातून चालणारे कामकाजसुद्धा पाहिले._
यासोबतच पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देत मंदिराचा समृद्ध वारसा आणि स्थापत्यकलेची माहिती घेतली. जटायू अर्थ सेंटर, विवेकानंद रॉक मेमोरियल, सुचिंद्रम मंदिर, पद्मनाभपुरम पॅलेस येथील स्थळांना भेट देत प्राचीन द्रविड स्थापत्यकला आणि आध्यात्मिक महत्त्वाची माहिती मिळवली. पाच दिवसांच्या या दौऱ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यास मदत झाली. कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.स्वप्नील राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.प्राजक्ता राणे, प्रा.बोनी शेरॉन आणि प्रा.श्रुंखला नाईक यांनी या भेटीचे यशस्वी नियोजन केले.