शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचे टिकास्त्र
कणकवली | मयुर ठाकूर : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब निर्दोष होता, क्रूर नव्हता, उत्तम शासक होता असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या महान बलिदानाचा अपमान केला आहे. अशा विकृत विचारसरणीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या मातीत राहण्याचा अधिकार नाही. औरंगजेब कोण होता, हे आम्ही विसरलो नाही. तो एक धर्मांध, जिहादी, क्रूर अत्याचारी होता. त्याने लाखो हिंदूंना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले, मंदिरे उद्ध्वस्त केली, गुरू तेग बहादूर यांना शिरच्छेद केला आणि संभाजी महाराजांना अमानुष छळ करून ठार मारले. आज या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींची ही वक्तव्ये म्हणजे हिंदुत्वाचा अपमान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. अशा जिहादी विचारधारा असलेल्या महाराष्ट्रद्रोह्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही असे टिकास्त्र शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आझमी यांच्यावर डागले आहे.
शिवसेना आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त अशा औरंगजेबप्रेमी विचारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ठामपणे अबू आझमींना फटकारले, ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे खरे रक्षण आहे. मात्र केवळ शब्दांनी नाही, तर सरकारने तातडीने अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी आग्रे यांनी केली आहे. हिंदूंच्या अस्मितेवर वार करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या भूमीत राहून औरंगजेबचा गौरव करणाऱ्यांना महाराष्ट्रात एक इंचही जागा राहणार नाही! शिवसेना अशा राष्ट्रविरोधी प्रवृत्तीना चोख प्रत्युत्तर देईल. गरज पडल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरून अशा विकृत विचारसरणीला सडेतोड उत्तर देतील असे शिवसेना उपनेते आग्रे यांनी म्हटले आहे.