कणकवली – येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रस्तावनेत मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत म्हणाले की, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा पहिलाच जागतिक मराठी भाषा दिन आहे. आज महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. परंतु केवळ उत्सवी कार्यक्रम साजरे करून आपण थांबता कामा नये तर मराठी भाषेचा नित्य वापर आपण केला पाहिजे. यावेळी डॉ कामत यांनी अगदी विवेकसिंधु, लीळाचरित्र, भावार्थदीपिकेपासून मराठी भाषा कशी समृध्द होत गेली ते सविस्तर सांगितले. मराठी भाषेला ही फार मोठी परंपरा असल्यानेच ती अभिजात ठरली आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकेल का? जगेल का? हे प्रश्न निरर्थक ठरतात असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठी भाषा निश्चितपणे टिकणार आणि वैश्विक स्तरावर आगळावेगळा ठसा उमटवणार आहे, यात तीळमात्र शंका नाही असे डॉ. कामत यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या कवयित्री सरिता पवार म्हणाल्या की, मराठी भाषा ही आपली जीवनसाथी आहे. ती माय आहे. त्यामुळे तिच्यावर आपली निस्सीम प्रेम असले पाहिजे. ज्या भाषेच्या बोली जास्त आहेत ती भाषा समृद्ध असते. जशी कोणतीही नदी जिला जास्त उपनद्या मिळतात आणि ती मोठी होते. तशीच मराठी सुद्धा मोठी झाली आहे तिला असणाऱ्या बोलीमुळे. भाषा समृद्ध होण्यासाठी इतिहासाने मोठे योगदान दिले आहे. आपल्या समाजात प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीला नाव ठेवत असते. परंतु प्रत्येक पिढी ही आधुनिक विचाराने चालते हे वास्तव आहे. या आधुनिक विचाराला वाचनाची जोड मिळाली तर आपले आयुष्य ज्ञानमय होऊन जाते आणि परिवर्तनवादी पिढी निर्माण होते. भाषेच्या बाबतीत असेच आहे. आपल्या भाषेतून बोलले पाहिजे, वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे आणि त्याचबरोबर अन्य भाषांचाही आपण आदर केला पाहिजे. तरच आपली भाषा वाढेल आणि समृद्ध होईल. असे प्रतिपादन केले. जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून यावेळी कवयित्री सरिता पवार यांनी महाविद्यालयाला ग्रंथभेट दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, जागतिक स्तरावर मराठीचे भवितव्य उज्ज्वल आहे. आता सर्व शिक्षणाचे माध्यम हे प्रादेशिक भाषाच असणार आहे? म्हणजेच उच्च शिक्षणाचे ज्ञान आपल्या मुलाना आता आपल्या भाषेत मिळणार आहे? म्हणून राज भाषेला ज्ञानभाषा बनवण्याचे शासनाचे धोरण अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.नीता धुरी हिने तर पाहुण्यांची ओळख कु.शिवानी राणे हिने केले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व श्रोत्यांचे आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले.
जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने यावेळी मराठी विभागाच्या वतीने लोकसाहित्य व संस्कृतीला वाहिलेले भित्तिपत्रक प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.