को.म.सा.प.आणि गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंतीचे आयोजन
कणकवली : मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेविषयीची प्रियता-अप्रियता आणि एकंदरीत मराठी भाषेविषयीचे समज गैरसमज याविषयी सखोल भाष्य करत मान्यवरांकडून गोपुरी आश्रमच्या चिकू बागेत मराठीचा गौरवपर जागर करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखा आणि गोपुरी आश्रम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना ज्येष्ठ पत्रकार तसेच कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखेचे अध्यक्ष माधव कदम यांनी मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास तसेच या कार्यक्रमाचे महत्त्व सहज आणि सोप्या भाषेमध्ये मांडले. कार्यक्रमासाठी अनेक क्षेत्रातील मराठी भाषेवर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे, कणकवलीतील दंततज्ञ डॉ. विनायक करंदीकर, प्रसाद घाणेकर, कु. श्रेयस शिंदे, ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजस रेगे इत्यादी वक्ते म्हणून लाभले. कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी मराठी भाषेचा गौरव करत उपस्थित मान्यवरांना उदबोधित केले.. कार्यक्रमाचे उत्तरार्धात मराठी अभिनेत्री सौ. संगीता पोकळे निखार्गे यांचा जेष्ठ पत्रकार तसेच को. म. सा. प.चे खजिनदार अशोक करंबळेकर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना सौ. निखार्गे यांनी आपल्या कलाकार अभिव्यक्तीतून कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेवर भाष्य केले.