कणकवली : तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश भालचंद्र वाळके( वय ५२ रा. शिवडाव मांगरवाडी, मूळ गाव सावंतवाडी ) यांचे शनिवारी रात्री निधन झाले.
राजेश वाळके यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता.त्यामुळे त्यांनी आपला एक वेगळा ठसा समाजमनावर उमठविला होता. मागील दोन दिवस ते रजेवर होते. मिळालेल्या माहितीनुसार राजेश वाळके यांना गणेश मूर्ती कलेची आवड होती. गणेशमूर्ती आणण्यासाठी ते मुंबई येथे गेले होते. तेथून परतत असताना खेड येथे ते अचानक बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासल्यानंतर सांगितले. राजेश वाळके यांच्या निधनाने शिवडाव गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. काहींना अश्रूही आवरेनासे झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पुतण्या, विवाहित दोन पुतणी, भावजय असा मोठा परिवार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजेश वाळके यांनी एक उत्कृष्ट कला शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला होता. शिवडाव माध्यमिक विद्यालयामध्ये ते शिस्त प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी चित्रकला, रांगोळी, सुवाच्च हस्ताक्षर अशा अनेक विषयांचे मार्गदर्शन करून अनेक चांगले विद्यार्थी घडवले. त्यामुळे विद्यार्थी वर्गातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.