15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

देवस्वारींच्या कुणकेश्वर भेटीसाठी नदीवर बांधलेले होड्यांचे सेतू ठरत आहेत भेटीचे खास आकर्षण

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा : नऊ देवस्वाऱ्यांचे आगमन आणि ऐतिहासिक उत्साह..

देवगड : देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा यंदा २६ व २७ फेब्रुवारी रोजी या कालावधीत संपन्न होत आहे.यात्रेच्या निमित्ताने श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी नऊ प्रमुख देवस्वाऱ्या आपल्या पारंपरिक मार्गाने कुणकेश्वरमध्ये येत आहेत.
यात्रेच्या तयारीसाठी प्रशासन आणि भाविक युद्धपातळीवर काम करत असून, देवस्वाऱ्यांच्या मार्गांचे स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम पूर्णत्वास येत आहे. विशेषतः तब्बल ३८ वर्षांनंतर आचरा येथील श्री देव रामेश्वर स्वारीसह येत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे. या मार्गावर सागरी सेतूंची निर्मिती करण्यात आली असून, आचरा नदीवर तरंगता पूल, मिठबाव खाडीवर होड्यांचा पूल आणि कातवण खाडीवर १००० वाळूच्या पिशव्यांद्वारे सेतू उभारण्यात आला आहे. या सर्व सागरी सेतूवरून ही ऐतिहासिक देवस्वारी मार्गक्रमण करणार आहे.

याशिवाय, देवगड-जामसंडे येथील श्री देवी दिर्बादेवी १२ वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी येत आहे.आई दिर्बा देवी रामेश्वर देवस्वारीसाठी तारामुंबरी मिठमुंबरी खाडीवर ३५ होड्यांचा भव्य सेतू उभारण्यात आला आहे, जिथून देवी आपल्या भक्तगणांसह सवारी करणार आहे.

कुणकेश्वर मंदिर परिसरातही यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक, पर्यटक आणि व्यापारी येणार असल्याने स्थानिक प्रशासनाने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांसाठी निवास व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात आहे.

यंदाची कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा ऐतिहासिक ठरणार असून, नऊ प्रमुख देवस्वाऱ्यांचे आगमन, परंपरागत सागरी मार्ग आणि भक्तांचा उत्साह या यात्रेचा मुख्य आकर्षण असणार आहे. भाविकांसाठी ही यात्रा भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम ठरणार आहे.
यावर्षी महा कुंभमेळ्याची सांगता असल्याने तीर्थस्थानाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेत भाविकांची संख्या अधिक वाढेल आणि यात्रेच्या आयोजनाला विशेष महत्त्व दिले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!