मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कर्ज योजना तसेच महिला व बँकेचा सुसंवाद व्हावा यासाठी बँकसखी सारखा अभिनव उपक्रम जिल्हा बँक राबवित आहे. भविष्यात महिलांनी बचत गटासाठी डिजीटल तसेच सोशल मिडीया माध्यमातून उत्पादीत मालाला चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मान. श्री. मनीष दळवी यांनी केले. जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील देवी भराडी जत्रौत्सवाचे औचित्य साधुन बँकेशी सलग्न महीला बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा विभागीय सह निबंधक मान. श्री. मिलिंदसेन भालेराव यांच्या हस्ते आज पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक श्रीम. दिपाली माळी यांची समयोचित भाषणे झाली.
या वेळी बोलतांना श्री. मिलिंदसेन भालेराव म्हणाले की बचत गटांच्या उत्पादनाना या कोकणच्या मातीचा सुगंध आहे आणि त्यांनी या मातीचा गोडवा जपला आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो महीलांना रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
कोकण हा निसर्गसौदर्याने परिपुर्ण असून भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहेत. याचा उपयोग बचत गटांनी सहकारच्या माध्यमातून आपल्या व्यवसायात करुन घेणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री गजानन गावडे, मेघनाद धुरी, व्हीक्टर डांन्टस, संदिप परब, तसेच अशोक सावंत, बाबु आंगणे, राजु परुळेकर, धोंडी चिंदरकर, श्रीम. सरोज परब, सतिश आंगणे व बचत गटाच्या महीला तसेच जत्रोत्सवाला उपस्थित भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.