सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल १५ वर्षांनी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दीपक केसरकर व नारायण राणे हे दादा-भाई आज एकत्र आले. यावेळी आमचे वैरत्व कधीच नव्हते, चांगल्या कामाला केसरकर यांनी कधीच विरोध केला नाही किंवा त्यांनी चांगल्या कामात कधीही विरोधाचा झेंडा दाखवला नाही, असे सांगून राणे यांनी केसरकर यांचे कौतुक केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज श्री. राणे यांनी आज मंत्री केसरकर यांच्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी राणे यांचे स्वागत करण्यासाठी केसरकर हे आपल्या लवाजम्यासह बाहेर येऊन थांबले. त्यानंतर त्यांनी राणे यांना आपल्या कार्यालयात नेले. तत्पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. राणे म्हणाले, आमचे दोघांचे कधीही वैरत्व नव्हते. जे काही होते ते राजकीय मतभेद होते. चांगल्या कामासाठी आम्ही अनेक वेळा बोललो. एकमेकांना फोन करत होतो. त्यामुळे आम्ही एकत्र आलो, असे म्हणणे चुकीचे.