एसटी, रेल्वेत वयोवृद्ध महिलांचे ऐवज लंपास करणा-या सराईताला ठोकल्या बेड्या
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी केला निष्पन्न
कणकवली : शहरामध्ये काही अज्ञात आरोपींकडून एसटी बस व रेल्वेमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे हातातील सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेऊन कट करून चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी 18 व 19 फेब्रुवारीला अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत वांद्रापाडा या ठिकाणी कणकवली पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वषेण सिंधुदुर्ग विभागाच्या संयुक्तपणे राबवलेल्या मोहीमेत या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रीतम देवदास गायकवाड, (वय-35) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईबद्दल पोलीसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या प्रकरणात संशयित आरोपींनी प्राथमिक चौकशीत कणकवलीत विविध चोरी केली असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर साथींदारासह गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कणकवली पोलीस ठाणे व गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग यांचेकडून समांतर तपास सुरू असताना गुन्हाचे घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही संशयित आरोपीत इसमांचा गुन्ह्याचे घटनेमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा वांद्रापाडा, अंबरनाथ (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे वास्तव्यास असल्याच्या गोपनीय माहितीनुसार सिंधुदुर्ग पोलीसांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधिक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, गुन्हा अन्वेषणचे उपनिरीक्षक आर. बी. शेळके, पोलीस श्री. कोयंडे, श्री. देसाई यांनी मिळून ही कारवाई केली आहे.