कुडाळ: महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने २३, २३ व २४ फेब्रुवारीला “पिंगुळी लोककला महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरवाडी म्युझियम पिंगुळीच्या पटांगणावर सायंकाळी ६ ते १०.३० या वेळेत हा महोत्सव होणार आहे. याचे उद्घाटन २२ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय लोककलाकार व कलागुरू गणपत मसगे, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष भगवान रणसिंग, ठाकर लोककला संवर्धन व पर्यटन संस्था अध्यक्ष भास्कर गंगावणे, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग यांनी दिली. शासना मार्फत जिल्ह्यात प्रथमच हा अशाप्रकारचा लोककला महोत्सव होत असून या निमित्ताने ठाकर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी म्हणून राधा नृत्य, कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी,पांगुळ बैल, पोवाडा, पोतराज , तारवागीत , डोनागीत, असे विविध कलाप्रकार होणार आहेत . या लोककला महोत्सवाचा उद्घाटन सोहळा हा शनिवार दि. २२फेब्रुवारीला सकाळी ठीक ११.३० वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ या ठिकाणी राज्य सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे,आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे उपस्थित राहणार आहेत. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील ठाकर समाजाने गेल्या कित्तेक वर्षापासून कला व सांस्कृतिक क्षेत्रात नांवलौकिक प्राप्त करत, पिंगुळी गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिच ओळख पिंगुळी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वासमोर येईल. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या आयोजनात व पिंगुळी गावातील सर्व ठाकर ग्रामस्थ, जिल्हास्तरीय ठाकर समाजातील सामाजिक संस्था व ठाकर ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने हा महोत्सव २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे . श्री मसगे म्हणाले, श्री देव रवळनाथ, भाद्रकली, वरंडेश्वर यांच्या आशीर्वादानेच पिंगुळी गावात हा पिगुळी लोककला महोत्सव 2025 होत आहे, हा महोत्सव होण्यासाठी शासन दरबारी गेले एक वर्ष मसगे व त्यांचे सुपुत्र प्रयत्न करत होते. ठाकर लोक कलाकारांना एक वेगळे व्यासपीठ देत सरकारने व सांस्कृतिक खात्याने ठाकर लोककलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे असेही मसगे म्हणाले. हा महोत्सव ठाकर समाजाकडून संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना एक आभूतपूर्व सांस्कृतिक कला पर्वणी ठरेल असा ठाकर ग्रामस्थानचा मानस आहे . या महोत्सवाच्या निमित्ताने ठाकर समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार समारंभ ही आयोजित केला आहे. पिंगुळी गाव हा ज्या कलांमुळे ओळखला जातो तो ठाकर समाज असून या महोत्सवाच्या निमित्ताने कळसुत्री बाहुल्या, तरवा गीत, डोना गीत, यांसारख्या विविध लोप पावत जाणाऱ्या लोककला सादर होणार आहेत. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी “राम जन्मोत्सव ” हा कळसूत्री बाहुल्यांचा नाविन्यपूर्ण पारंपारिक व आधुनिक असा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा पहिला शो हा इंटरनॅशनल पपेट फेस्टिवल बेंगलोर येथे झाला होता यानंतर तो प्रथमत:च आपल्या जिल्ह्यात होणार आहे. दुसऱ्या दिवशी ठाकर लोककलातील एक वेगळी ओळख दाखवणारा पोवाडा कार्यक्रम, कणकवली येथील प्रसिद्ध राधा नृत्य, तसेच सुकळवाड येथील ठाकर कलाकारांचा पारंपारिक गोंधळ व खुणांची भाषा हा एक नाविन्यपूर्ण व आगळावेगळा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. खुणांची भाषा ही ठाकर समाजातील एक वैशिष्ट्यपूर्ण अशी भाषा असून या भाषेचा उपयोग शिवकाळामध्ये गुप्तहेरीसाठी केला जायचा, यानंतर पिंगुळी येथील राधा नृत्य, फुगडी, पिंगळा असे दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत . महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दुर्मिळ व काळाच्या पडद्याआड जाणारा कलाप्रकार तरवा गीत, दोडामार्ग येथील पारंपरिक राधा नृत्य, मालवण कट्टा येथील गोंधळ व संबळ तुणतुणं वादन, आगी सोबत खेळ करून दाखवणारा पोतराज, पुरातन अशा चामड्याच्या बाहुल्या यांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. हा महोत्सव नागरिकांसाठी मोफत असणार असून हा महोत्सव पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी आकारली जाणार नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने ठाकरवाडी म्युझियमच्या पटांगणावर भव्य दिव्य असा रंगमंच तयार केला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी पिंगुळी लोककला महोत्सव २०२५ मध्ये उपस्थित राहून या सर्व पारंपरिक लोककलांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.