वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश
सायंकाळी “त्या’ ठिकाणी रंबलर बसवण्याचे काम झाले पूर्ण
कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. गुरुवारी रात्री देखील ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आई व मुलगा दोघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान या ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी वारंवार उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. या मागणीची गंभीर्याने दखल घेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गडनदी पुलापासून महामार्गावर रंबलर लावण्याच्या सूचना संबंधीत प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार तात्काळ काम सुरू करण्यात आले. जेणेकरून पुलावरून वागदे च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी होऊन वळणावर होणारे अपघात टळतील. प्रत्यक्ष पहाणी केली असता त्या ठिकाणी घातलेल्या रंबलरमुळे काही प्रमाणात वाहनांच्या वेगावर नियंत्रण येत असून जनतेमधून समाधानकारक प्रतिक्रिया उमटत आहेत.