कणकवली : अवैध सिलिका वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने तीन पथकांची नियुक्ती केली आहे. तालुक्यातील अवैध सिलिका उत्खनन आणि वाहतूकप्रकरणी उद्धवसेनेच्या युवासेनेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल महसूल प्रशासनाने घेतली आहे.
कासार्डे आणि लगतच्या गावांमध्ये सिलिकाचे उत्खनन होते. मात्र, अनेक ठिकाणी विनापरवाना हे उत्खनन सुरू आहे. महसूल विभागाने जप्त केलेला सिलिका साठ्यातील वाळूची उचल केली जात आहे. परवाना न घेता ही वाळू वाहतूक केली जात असल्याची तक्रार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली होती.
याप्रकरणी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही युवासेनेने दिला होता. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी अवैध सिलिका उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी तीनभरारी पथकांची नियुक्ती केली आहे. निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव हे पथकांचे प्रमुख आहेत.
तलाठ्यांचा समावेश
या पथकांमध्ये मंडल अधिकारी आणि त्या मंडलात येणाऱ्या सर्व तलाठ्यांचा समावेश आहे. अवैध उत्खनन, सिलिका वाहतूक याची पाहणी करणे, पाहणीनंतर त्याबाबत रीतसर कारवाई करणे याची जबाबदारी या पथकाकडे दिली आहे.