गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे गौरवोद्गार
कणकवली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेला पालक मेळावा हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कळसुली बीटच्या माध्यमातून 0 ते 3 वर्षाच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून असे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत या पूर्वी असे उपक्रम तालुका स्तरावर घेण्यात येत होते मात्र प्रथमच ग्रामपंचायत स्थरावर हा उपक्रम राबविण्यात येत असून कळसुली बीटच्या सर्व टीम ने सुनियोजित कार्यक्रम घेतला आहे. असे गौरवोद्गार गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी काढले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत पालक मेळावा अर्थात छोट्या मुलांची जत्रा उपक्रमाचे आयोजन हळवल ग्रामपंचायत येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, श्री शिंदे, हळवल सरपंच अपर्णा चव्हाण, ग्रामसेवक दयानंद गंगावणे, प्रकल्प अधिकारी उमा हळदणकर, स्नेहा सामंत, गीता पाटकर, स्वप्नाली नाईक, रूपाली गोवेकर, भाग्यश्री रसनकुटे, अक्षता बुचडे, पर्यवेक्षिका आकांक्षा गायकवाड सामुदायिक आरोग्य अधिकारी कळसुली विभाग अश्विनी तावडे आदींसह कळसुली बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका, पालक उपस्थित होते.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात विविध स्टॉल उभारण्यात आले होते. मुलांना विकत घेऊन खेळणी न देता घरातील रोजच्या वापरातील वस्तू देऊन त्यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक विकास कसा होईल याची प्रात्यक्षिके या मेळाव्यात दाखवण्यात आली. 0 ते 3 वर्ष वयोगटातील लहान मुलांनी या उपक्रमात सहभाग घेऊन सर्व खेळांचा आनंद घेतला. त्यासोबत उपस्थित पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम वारंवार घेण्यात यावेत असेही सांगितले.