आचरा पोलिसांनी कारवाई करत केली अटक
आचरा : मालवण तालुक्यातील एका गावातील इसमाने पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करत महिलेच्या घरात शिरून अंगाला लज्जास्पद स्पर्श करत शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. सदर महिलेने त्या इसमावर विरोधात आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आचरा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार पोलीस पाटील मारुती जंगम (वय ५८) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
आचरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती सदाशिव जंगम (वय ५८) या पोलीस पाटीलाने एका महिलेच्या घराकडे पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करत घराच्या पडवीत प्रवेश केला महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असा स्पर्श केला. महिलेने त्याला विरोध करत आपली सुटका करून घेतली. पती कामावरून घरी आल्यानंतर झालेला प्रकार पतीला सांगून आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून आचरा पोलीसांनी पोलीस पाटील मारुती सदाशिव जंगम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७५(२), कलम ७९ नुसार विनय भंगाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.