मोठे रॅकेट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप ; चौकशी व्हावी, जिल्हा प्रशासनाकडे मागणी
सावंतवाडी : बॉक्साईटचा अंश असलेले चिरेयुक्त माती आणि दगड युक्त चोरटी वाहतूक काही अज्ञाताकडुन केली जात आहे. हा प्रकार मळेवाड-आजगाव परिसरात सुरू आहे. दरम्यान यामागे महसुलच्या अधिकार्यांचा हात असून या प्रकारामागे मोठे रॅकेट असल्याचा आरोप करीत या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तेथील स्थानिक ग्रामस्थांकडुन करण्यात आली आहे. आजगाव-मळेवाड येथे महसुलची परवागनी घेवून चिरे काढले जातात. परंतू त्या ठिकाणी चिरे काढण्यापुर्वी काढण्यात आलेल्या माती दगडात बॉक्साईटचा अंश असल्याचे आढळून आल्यामुळे या मातीयुक्त दगडाची चोरटी वाहतूक केली जात आहे. त्यासाठी बोगस पासची जुळवाजुळव केली जात असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांकडुन देण्यात आली असून गोव्याच्या सिमेवर असलेल्या एका गावात पाचशे डंपरहून अधिक गाड्याचा साठा करण्यात आल्या असून त्या कर्नाटक हॉस्पेट येथे पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे ग्राामस्थांचे म्हणणे असून या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात आली आहे.