कुडाळ : तालुक्यातील झाराप झिरो पॉईंट येथे चहाच्या कपात माशी पडल्याने चहा बदलून द्यावा, अन्यथा पैसे देणार नाही, असे सांगितल्याच्या रागातून पुणे येथील पर्यटकाला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कात्रज येथील पर्यटक रुपेश बबन सपकाळ (३३) आणि त्यांचे मित्र संजय चव्हाण हे झाराप झिरो पॉईंट येथील तनवीर करामत शेख यांच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहाच्या कपात माशी आढळल्यानंतर सपकाळ यांनी चहा बदलून द्यावा, अशी मागणी केली. मात्र, तो बदलून न दिल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून हॉटेल चालक तनवीर शेख यास संताप आला आणि त्याने आपल्या कुटुंबीयांसह मिळून सपकाळ यांना काठीने व हाताच्या ठोशांनी मारहाण केली. तसेच त्यांचे कपडे फाडून हातपाय दोरीने बांधून ठेवले. त्यांच्या सोबत असलेल्या संजय चव्हाण यांनाही मारहाण करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ममता जाधव आणि पोलिस कर्मचारी योगेश मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहोचण्याच्या वेळी सपकाळ यांचे हात मागे करून बांधले होते आणि पायही दुमडून दोरीने घट्ट आवळले होते. पोलिसांनी तात्काळ त्यांची सुटका केली.
या प्रकरणी संबंधित पर्यटकांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, घटनास्थळावरची भीषण परिस्थिती पाहून कुडाळ पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल केली. पोलिस शिपाई योगेश मुंढे यांच्या तक्रारीवरून तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (५७), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (१८), परवीन शराफत शेख (४२), साजमीन शराफत शेख (१९) आणि तलाह करामत शेख (२६, सर्व रा. झाराप खान मोहल्ला, कुडाळ) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर करत आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना अमानुषपणे मारहाण करणे आणि त्यांना बांधून ठेवणे हा गंभीर गुन्हा असल्याने पोलिस प्रशासन स्वतः पुढाकार घेत कारवाई करत आहे.