युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा ; तहसीलदारांना दिले निवेदन..
कणकवली : कासार्डे गावात अवैधपणे सिलिका उत्खनन आणि त्याची वाहतूक केली जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांचे यात लागेबांधे असल्याने या बेकायदेशीर प्रकारांवर डोळेझाक केली जात आहे. मात्र यात शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत अाहे. येथील बेकायदेशिर मायनिंग व्यवसाय बंद न झाल्यास युवासेनेतर्फे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज दिला. श्री.नाईक यांनी कासार्डे येथील अवैध सिलिका मायनिंग व्यवसायावर कारवाई व्हावी यासाठीचे निवेदन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले. त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड आदी उपस्थित होते. निवेदनात श्री.नाईक यांनी म्हटले आहे की, शासनाकडे कोणताही कर न भरता कासार्डे येथे अवैधपणे सिलिका उत्खनन सुरू आहे. त्याची बेकायदेशीरपणे वाहतूक देखील सुरू आहे. कासार्डे येथे मायनिंग करण्यासाठी इथल्या व्यावसायिकांनी नवीनच शक्कल लढवली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेत जमिनींमध्ये तळी निर्माण करण्यासाठी परवानगी घेतली जाते. त्यासाठी शासनाकडून अनुदानही घेतले जाते आणि जमिनीतील सिलिका उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाची पूर्णत: डोळेझाक सुरू आहे. येथील अवैध मायनिंग तातडीने बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री.नाईक यांनी दिला.