डॉक्टरांची रिक्त पदे , ठेकदारांची थकलेली बिले तसेच जिल्हा नियोजनला राणेंनी ४०० कोटी आणावेत
कणकवली : जिल्हा नियोजन बैठक राणे कुटुंबीयांनी चांगली चालवली अशा प्रकारची चर्चा सगळीकडे सुरू आहे. वडिलांनी मुलांना शिकवल्यासारखे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ही अभिनंदनाची गोष्ट आहे. मात्र, जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांमधील रिक्त पदे त्यांनी तत्काळ भरावीत. जिल्ह्यातील ठेकेदारांचे विविध विकासकामांपोटी सव्वा दोनशे कोटी रुपये थकीत आहेत, ते मार्च पूर्वी मिळवून द्यावेत. जाहीर केल्याप्रमाणे ४०० कोटी रुपये जिल्हा नियोजनसाठी आणून दाखवावेत.तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत. यागोष्टी सहा महिन्यात केल्यास उद्धवसेनेतर्फे पालकमंत्र्यांचा जाहिर सत्कार करु, असे प्रतिपादन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. कणकवली येथिल संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी सर्व शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे जनतेला आरोग्यावरती जो विनाकारण खर्च होतो तो थांबेल. रुग्णाना गोव्याला पाठवू नका असे म्हणत असताना तज्ज्ञ डॉक्टर , सर्जन किंवा अन्य डॉक्टर हे सुद्धा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ठेकेदारांनी विविध कामांची ८९ हजार कोटीची बिल थकीत असल्यामुळे आंदोलन सुरु केले आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना या सर्व विभागातील कामांची ठेकेदारांची देयके अडकली आहेत. जिल्ह्यातले जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे कोटीची बिले या सर्व लाडक्या भावांची अडकलेली आहेत. सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना पैसे देते आणि काढूनही घेत आहे. तसेच लाडक्या भावांचे पैसेही त्यांना मिळवून द्या. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये अनैतिक धंदे चालू आहेत. ते थांबवण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केलेली आहे. मात्र, तसे धंदे करणारे काही लोक कधीकधी त्यांच्याच गाड्यांच्या ताफ्यात असतात. त्या गाड्यांना आधी बाजूला करावे. जे वडिलांना व आतापर्यंतच्या इतर पालकमंत्र्यांना जमले नाही ते म्हणजे ४०० कोटीवर जिल्हा नियोजनचा आकडा नेण्याची पालकमंत्र्यांनी हिम्मत दाखवली आहे , त्याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो , असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.