१५ जूनपासून अभियानाला होणार सुरुवात
कणकवली | मयुर ठाकूर : जिल्ह्यातील युवा पिढी अमलीपदार्थांच्या आहारी गेली आहे. या पिढीला अमलीपदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासन व पोलीस यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, शासन व पोलीस यंत्रणेकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. रोटरी क्लबच्या माध्यमातून 15 जूनपासून जिल्ह्यात अमलीपदार्थ सिंधुदुर्गमुक्त हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालय, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी अमलपदार्थ सेवन करून नये याकरिता जगजागृती केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. अनिल नेरूरकर यांनी दिली.
संजीवनी हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रोटरीचे डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर, राजन बोभाटे, महादेव पाटकर, मंजिरी घेवारी आदी उपस्थित होते.
श्री. नेरूरकर म्हणाले, जिल्ह्यातील युवापिढी अमलीपदार्थांचे सेवन करीत आहे. या पिढीला अमलीपदार्थ पुरविणारे जिल्ह्यात रॅकेट सक्रिय आहे. या रॅकेटमध्ये काम करणार्यांना सहजरित्या पैसा मिळत आहे. किनारपट्टी भागात अमलीपदार्थ खरेदी व विक्रीचे व्यवहार होतात. किनारपट्टी भागात युवा पिढी अमलीपदार्थ सेवन करतात. विशेष म्हणजे अमलीपदार्थ सेवन करणार्यांमध्ये युवकापेक्षा युवतींचे प्रमाण जास्त आहे, ही चिंतेची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
युवा पिढी अमलपदार्थांचा विळख्यात अडकली आहे. या पिढीला बाहेर काढण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. अमलीपदार्थांचे सेवन करणार्यांना हे पदार्थ सेवन करण्यापासून रोखण्यासाठी तालुकानिहाय हेल्पलाईन लाईन नंबरसेवा सुरु केली जाणार आहे. याशिवाय अमलीपदार्थ सेवन करणार्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालयांमध्ये शिकणार्या विद्यार्थी अमलीपदार्थ सेवन करू नये याकरिता रोटरी क्लबतर्फे १५ जूनपासून मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृतीची मोहीम हाती घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अमलीपदार्थांच्या सततच्या सेवनामुळे तरुण-तरुणी नियंत्रणा बाहेर जात आहे. त्यांच्याकडून वाईट कृत्ये घडत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. युवापिढीला अमलीपदार्थ सेवन करावयाला लावण्यासाठी जिल्ह्यात रॅकेट सक्रिय असून या रॅकेला रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करताना रोटरी क्लबच्या अमलीपदार्थमुक्त सिंधुदुर्ग अभियानात सामाजिक संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. नेरूरकर यांनी केले. राजन बोभाटे, महादेव पाटकर, डॉ. सुहास पावसकर यांनी अमलीपदार्थ हे स्लो – पॉयझनिंग असून तरुण पिढीने हे पदार्थ सेवन करून नये म्हणून पालकांनी दक्ष राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.