जनतेचा आवाज दाबून जनतेला गृहीत न धरता बेकायदेशीर कारभार साटेली तर्फ सातार्डामध्ये सुरू असल्याचा केला आरोप
लवकरच याबाबत जनतेला सोबत घेऊन आंदोनल उभारणार असल्याची दिली माहिती
सिंधुदुर्गात “वाल्मीक कराड’ निर्माण होऊ नये ही माझी भूमिका – जिल्हाप्रमुख संदेश पारकर
सिंधुदुर्ग : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी एकत्रित आले. ग्रामपंचायत ग्रामसभेत त्या पद्धतीचे ठराव देखील झाले. परंतु प्रशासनाकडून त्याबाबतची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याकरिता पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी साटेली तर्फ सातार्डा येथील ग्रामस्थ २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. तसेच श्री. पारकर यांनी साटेली तर्फ सातार्डा च्या नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्ये संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेतली.
दरम्यान जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर श्री. पारकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनाला जाग आणण्यासाठी आवाज उठविला होता. आज या ग्रामस्थांच्या पाठीमागे कोणतेही नेतृत्व नसल्यामुळे त्यांची योग्य बाजू असून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आहे. उपोषणकर्त्यांची जी मागणी आहे,जे अनधिकृत मायनिंग तसेच लोह खनिज उत्खनन सुरू आहे, त्याला या गावाचा पूर्णपणे विरोध आहे. या भागातील जमीन मालक किंवा शेतकरी एकत्र येऊन सदरचे उपोषण सुरू केले आहे. २०२१ मध्ये जे काही नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं झालं होतं त्याची नुकसान भरपाई सुद्धा २०२५ सुरू झालं तरी मिळत नाहीय. ज्यावेळी मायनिंग सुरू करायची होती तेव्हा त्यांचा जनतेशी जो करार झाला होता त्यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नाही. नितीन पाटील किंवा त्या ठिकाणी जे कोणी मायनिंग करत आहेत किंवा अनधिकृत उत्खनन करत आहेत यांची सुद्धा त्या गावात दादागिरी सुरू आहे. ज्या पद्धतीने बीडमध्ये झाले. ज्या पद्धतीने राखेच्या मायनिंग मधून “वाल्मिकी कराड’ निर्माण झाला. लढणारा सरपंच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. त्यामुळे जे सत्यासाठी नागरिक लढत आहेत त्यांचा लढा हा अनधिकृत मायनिंगच्या विरोधात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाल्मिकी कराड निर्माण होऊ नये ही भूमिका मी या ठिकाणी स्वीकारलेली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, खनिकर्म विभाग, पोलीस अधीक्षक, वनविभाग, आरटीओ, नागपूर मायनिंग विभाग, गोव्याचे मायनिंग विभाग, कोल्हापूर मायनिंग विभाग या सगळ्या विभागांशी पत्रव्यवहार मी स्वतः केला. तसेच उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी देखील पत्रव्यवहार केला. परंतु संबंधित प्रशासनाकडून कोणतेही उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. जनतेचा आवाज दाबून जनतेला गृहीत न धरता बेकायदेशीर कारभार साटेली तर्फ सातार्डा मध्ये सुरू आहे. तो हाणून पाडण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत. त्या दशक्रोशीमध्ये उग्र आंदोलन साटेली तर्फ सातार्डा या भागातील जनतेला विश्वासात घेऊन लवकरात लवकर करणार आहोत. तसेच सामायिक जमीन क्षेत्र असलेल्या भागातील तीन पैकी एका भावाची संमती घेऊन उत्खनन सुरू केलेले आहे. मात्र इतर दोन भावांचा त्याला विरोध आहे. तरीही मनमानी करून हे सुरू केलेलं आहे. अशी अनेक बेकायदेशीर कामे सुरू असल्याची उदाहरणे आहेत. उत्खननामुळे वन्य प्राणी देखील मोठ्या प्रमाणात जंगल सोडून लोकवस्तीत आलेले आहेत. बेसुमार वृक्षतोड देखील त्या ठिकाणी सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर चालली आहे. धुळीचे मोठे साम्राज्य असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावचा विकास देखील ठप्प झालेला आहे. मायनिंग बंद करण्यासाठी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी लवकरच या ठिकाणी मोठ आंदोलन उभारल जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९२ गाव इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये आहेत. त्यामध्ये साटेली तर्फ सातार्डा गाव आलेलं असून त्या राजपत्रात या गावाचा उल्लेख आहे. ज्याप्रमाणे १९३ गावांत कोणतंही मायनिंग किंवा मेजर मायनिंग बंद आहे. मग साटेली तर्फ सातार्डा गावामध्ये मायनिंग सुरू का? कोणत्या प्रशासनाने परवानगी दिली ? याबाब उत्तर आम्हाला पाहिजे आहे.
जनतेचा व ग्रामस्थांचा विरोध, जमीन मालक, शेतकऱ्यांचा विरोध या सगळ्या गोष्टींमध्ये जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरू आहे. अपघात होत आहेत. काल देखील अपघातात एका गाईचा मृत्यू झाला. अनेक चुकीच्या गोष्टी या ठिकाणी सुरू आहेत. याला वरदहस्त कोणाचा ? असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश परकर यांनी उपस्थित केला आहे.