0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

मोठी अपडेट.! अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार ? | हायकोर्टात अहवाल सादर

ठाणे : बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला ते पाच पोलिस जबाबदार आहेत, असा निष्कर्ष कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत न्यायदंडाधिकाऱ्यांनी काढला आहे. स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते, असेही अहवालात नमूद आहे.

अहवालात काय?

‘त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते. झटापटीत अक्षयवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला, हे पोलिसांचे म्हणणेही न्यायोचित वाटत नाही’ असे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.

‘गोळा केलेले पुरावे आणि न्यायसहायक प्रयोगशाळेचा अहवाल लक्षात घेता, अक्षय शिंदे याच्या पालकांचे आरोप योग्य वाटतात. पोलिस या मृत्यूला जबाबदार आहेत, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नोंदवला आहे’, अशी माहिती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज सुनावणीदरम्यान दिली.

‘अक्षयचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला नसून पोलिसांनी बनावट चकमकीत त्याची हत्या केली’ असा आरोप करत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिका केली आहे. त्या विषयीच्या सुनावणीदरम्यान सीलबंद लिफाफ्यात सादर झालेल्या अहवालातील निष्कर्ष खंडपीठाने वाचून दाखवला

या अहवालाचा विचार करून राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करेल आणि एफआयआर नोंदवून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती नंतर मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी खंडपीठाला दिली

फास्ट ट्रॅकची मागणी

‘बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुली या खूप लहान आहेत. त्यामुळे त्या प्रकरणाचा खटला शीघ्रगती न्यायालयात चालवायला हवा आणि खटल्याची सुनावणीही जलदगतीने पूर्ण व्हायला हवी. त्यादृष्टीने प्रयत्न करा,’ अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात राज्य सरकारला केली होती. बदलापूरमध्ये सुमारे चार वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा कथित पोलिस चकमकीत मृत्यू झाला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनातील दोन सदस्यांविरोधातही गुन्हा नोंद असल्याने ‘एसआयटी’ने तपास पूर्ण करून कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी त्या सुनावणीत याविषयी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाला माहिती दिली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!