पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या घरापासून ती शिकत असलेल्या अकॅडमी पर्यंत वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी केली. तसेच तिच्या मोबाईलवर सतत संपर्क करुन विनयभंग केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवडा भागातील गांधीनगर परिसरातील एका अकॅडमी जवळ घडला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विजय चांदणे ( वय- २२ रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) याच्यावर आयपीसी ३५४ ड, ५०६ सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी गांधीनगर परिसरातील एका अकॅडमीत शिकते. पीडित मुलगी अकॅडमीत जात असताना आरोपीने तिचा घरापासून अकॅडमी पर्यंत वारंवार पाठलाग करुन प्रपोज केले.
तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु जर माझ्याशी लग्न केले नाहीतर स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिली. तसेच मुलीच्या मोबाईलवर सतत फोन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
भररस्त्यात महिलेसोबत असभ्य वर्तन
बाणेर : रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरुन आलेल्या एका अनोळखी तरुणाने अश्लील स्पर्श करुन विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि.११) बाणेर येथील ताम्हाणे चौक ग्राऊंड जवळ घडली. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.