कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली पर्यटन महोत्सव येत्या ९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त उद्घाटनादिवशी ९ जानेवारी ला सुप्रसिद्ध गायक सलमान अली यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. कणकवली पर्यटन महोत्सवानिमित्त दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम पाहण्याची संधी कणकवलीवासीयांना मिळणार आहे, अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केले. पर्यटन महोत्सवाच्या स्टेजसह आजूबाजूच्या स्टॉल उभारणीला देखील सुरुवात झाली आहे.
अशी असणार कार्यक्रमाची रूपरेषा
९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रा, सायंकाळी ६:३० वाजता फूड फेस्टिव्हल, रात्री ८ वाजता उद्घाटन, ८:३० वाजता सुप्रसिद्ध गायक सलमान अली यांचा कार्यक्रम होणार आहे. सलमान अली हा २०१८ मधील इंडियन आयडॉलच्या दहाव्या पर्वाचा विजेता आहे. सन २०११ मध्ये सा रे ग म प या लिटिल चॅम्पस् पर्वाचा उपविजेताही ठरला होता. २०१९ पासून त्याने पार्श्वगायक म्हणून चित्रपट, मालिका आदींना आवाज दिला. सब बढिया है, दबंग – ३ मधील आवारा, सय्योनी आदी गाणी सलमान अली याने गायिली आहेत. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या सलमान अली याच्या कार्यक्रमाची पर्वणीच रसिकांना पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
१० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता “आम्ही कणकवलीकर” हा २५० स्थानिक कलाकारांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ऋषी सिंग, नितीन कुमार, सायली कांबळे आदी नामवंत इंडियन आयडॉल गायकांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार, १२ जानेवारीला महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी नामवंत गायक तसेच सिनेस्टार व कलाकारांचा कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.