गोपुरी आश्रमात साने गुरुजी १२५ जयंती समारोहाची सांगता
कणकवली : बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो -बाबासाहेब नदाफ ;गोपुरी आश्रमात साने गुरुजी १२५ जयंती समारोहाची सांगता बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! हे साने गुरुजींचे विचार युवाईने आत्मसात करून देश बलवान करण्यासाठी प्रयत्न करावा. हे साध्य करण्यासाठी आपल्या डोक्यातील जाती-धर्माची कीड टाकून द्यावी लागेल. देशातील सर्व मानव एक आहे, ही भावना मानवा- मानवात रुजवावी लागेल. यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. हेच खरे साने गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन ठरेल! असे भावनात्मक आव्हान राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ यांनी गोपुरी आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती अभियानाच्या समारोप प्रसंगी युवा वर्गाला संबोधित करताना केले.
यावेळी गोपूरी आश्रमाचे उपाध्यक्ष कृषी तज्ञ विजय सावंत, सचिव विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, संचालिका अर्पिता मुंबरकर, कणकवली महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे,प्रा. अदिती मालपेकर-दळवी व त्यांचे सहकारी, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत पाटील, सहशिक्षक भगीरथ चिंदरकर,राणे मॅडम, निवृत्त शिक्षिका माई मेस्त्री, कोल्हापूर सेवा दलाचे प्रशिक्षक कांबळे, गोपुरी आश्रमाचे सदाशिव राणे, सतिश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
नदाफ पुढे म्हणाले की मानवाच्या रक्ताचा रंग भगवा- हिरवा- निळा नसतो, तर तो ‘लालच’असतो! म्हणजेच सर्व मानव एक आहे! सर्व धर्मानी सहिष्णुताच शिकवली आहे आणि साने गुरुजीं च्या विचारांचा हाच प्राण आहे, याचे भान भावी युवा पिढीने ठेवायला हवे. देश माझा आहे- मी देशासाठी आहे, हा विचारही आपल्या हृदयात तेवत ठेवायला हवा.या कार्यक्रमात असरोंडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘आता उठवू सारे रान’ हे साने गुरुजींनी लिहिलेले गीत सादर केले. तर निवृत्त शिक्षिका माई मेस्त्री यांनी साने गुरुजींच्या आंतरभारती संकल्पनेवर आधारित ‘खरा तो एकची धर्म’ हे साने गुरुजींचे गीत सादर केले.
कोल्हापूर सेवा दलाचे प्रशिक्षक श्री कांबळे यांनी साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या गीतावर नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकासहित मान्यवर आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी साने गुरुजींचे मानवतेचे, माणसाला माणूस म्हणून जोडण्याचे विचार कृतीत आणण्याचा संकल्प करून १२५ जयंती समारोहाची सांगता करण्यात आली.