ब्लड कॅन्सरने आजारी चिमुकल्या काव्या शेळकेचे दुःखद निधन
मालवण : तालुक्यातील आचरा (मूळ गाव चिंदर पडेकाप) येथील एका गरीब कुटुंबातील अवघ्या तीन वर्षाची कु काव्या चंद्रशेखर शेळके हिच्यावर ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यामुळे गेले पंधरा दिवस बांबूळी गोवा येथे उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री अचानक काव्याची प्रकृती खालवल्याने तिला रात्री अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. शनिवारी पहाटे दुर्धर आजाराशी झगडणाऱ्या चिमुकल्या काव्याचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. तिच्या जाण्याने शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हसत खेळत बागडणाऱ्या काव्याला ताप येवू लागल्याने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र गोवा येथे आचरा येथील अवघ्या तीन वर्षाची मुलगी काव्या शेळके हिला ब्लड कॅन्सर झाला असल्याचे निदान झाले होते. गोवा येथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. पालकांची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. काव्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत होते. काव्या बरी व्हावी म्हणून अनेकजण देवाकडे साकडे घालत होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. शनिवारी पहाटे उपचारदरम्यान तिची प्राणज्योत मालावली. काव्या च्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी व इतर नातेवाईक आहेत. तिच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.