कणकवली : जानवली-गावठणवाडीतील संदिप शांताराम राणे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यानी फोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. यापूर्वी तीनवेळा घरफोडीचा प्रकार याच घरात घडला होता.
संदिप राणे हे मुंबईला राहत असतात त्याच्या शेजारी राहणारे वसंत महादेव परूळेकर घराची साफसफाई करतात. काल सायंकाळी त्यांनी अशीच घराची साफसफाई करून घर सायंकाळी ७ वाजता कुलूपबंद केले होते. सकाळी त्यांना घराच्या पुढील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला निदर्शनास आला. त्यांनी संदिप राणे यांना कॉल करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी सांगितले घरात चोरीला जाण्यासारखी कोणतीही चिजवस्तू नव्हती. तेव्हा घरात जाऊन काय झाले ते बघ असे श्री. परूळेकर यांना संदिप राणे यांनी सांगितले. त्याप्रमाणे श्री. परूळेकर यांनी घरात जाऊन पाहिले असता चोरट्याने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. आतील कपाटाचे लॉक तोडून कपडे विस्कटून टाकले होते. याबाबत वसंत परूळेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.