-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

दिगंबरा दिगंबरा… भालचंद्र बाबा दिगंबरा च्या जयघोषाने व हजारो भाविक भक्तांच्या मांदियाळीने अवघी कनकनगरी दुमदुमली

कणकवली : दिगंबरा दिगंबरा… भालचंद्र बाबा दिगंबरा… पायी हळूहळू चाला… मुखाने भालचंद्र बोला… अशा जयघोषाने आणि हजारो भाविक भक्तांच्या मांदियाळीने अवघी कनकनगरी दुमदुमून गेली. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी तसेच सायंकाळी ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीने परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली. पाच दिवस लाखो भाविक भक्तांनी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतला.

योगीयांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. दररोज पहाटे समाधीपूजन, काकड आरती, भक्तांच्या कल्याणार्थ ‘भालचंद्र महारुद्र, महाभिषेक अनुष्ठान’ हा धार्मिक विधी, दुपारी महाआरती, महाप्रसाद, भजने, सायंकाळी कीर्तन, रात्रौ दैनंदिन आरती असे कार्यक्रम झाले. रविवारी बाबांचा ४७ वा पुण्यतिथी दिन होता. पहाटेच्या काकड आरतीपासूनच भाविक भक्तांनी समाधी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर भक्तांची गर्दी वाढतच गेली. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दुपारच्या महाआरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यानंतर भजने सुरू होवून महाप्रसाद कार्यक्रम झाला. जसजशी सायंकाळ झाली तसतशी लगबग सुरू झाली ती बाबांच्या पालखी मिरवणुकीची. विविधारंगी फुलांनी सजविलेली बाबांची पालखी लक्षवेधी ठरली होती. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, घोडे, उंट, वारकरी संप्रदाय आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. संस्थानकडून पटकीदेवी मार्गे बाजारपेठेतून तेलीआळी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि तेथून बाजारपेठेतून पुन्हा संस्थान अशा मार्गाने मिरवणूक झाली. या मिरवणूकीत बाबांच्या रुपातील देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला. पालखी मिरवणुकीच्या मार्गावर कणकवलीकरांनी सडारांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी बाबांच्या प्रतिकात्मक मूर्ती ठेवून बाबांचा जयघोष करणारी गाणी लावली होती.

पालखीतील भक्तगणांसाठी ठिकठिकाणी सरबत, चहा आणि नाष्ट्याची सोय केली होती. रात्री उशिरा पालखी संस्थानमध्ये पोहोचली आणि दैनंदिन आरती झाली. त्यानंतर भालचंद्र दशावतार नाट्य मंडळ हळवल यांचा ‘पुण्यप्रभाव’ हा दशावतार नाट्यप्रयोग झाला. एकूणच बाबांचा पुण्यतिथी महोत्सव सर्वांसाठीच यादगार ठरला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!