मसूरे | झुंजार पेडणेकर : बीएसएनएलच्या मसुरे तसेच आंगणेवाडी येथील मोबाईल टॉवर मध्ये सातत्याने होणाऱ्या बिघाडाबद्दल अधिकारी वर्गाचे लक्ष वेधण्यात आले होते. ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत सावंतवाडी येथील इंजिनिअर श्री. फुटाणे, मालवणचे कनिष्ठ अभियंता दिपक सलगर यांनी या टॉवर मधील बिघाड दूर केल्या बद्दल ग्राहकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. मसूरे एक्सचेंज मधील बॅटऱ्या खराब झाल्यामुळे वीज पूरवठा खंडित होताच पूर्ण एक्सचेंज बंद होत होते. त्यामुळे टॉवर सुद्धा बंद होत होता. तसेच मोबाइल कॉल कट होणे, आवाज स्पष्ट ऐकू न येणे, इंटरनेट स्पीड नसणे आदी विविध समस्याना ग्राहकांना सामोरे जावे लागत होते. या सर्व समस्या बाबत युवा नेते पंढरीनाथ मसूरकर यांनी अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले होते. दरम्यान नवीन बॅटरी बसवणे तसेच सावंतवाडी मुख्य कार्यालयाकडून मसूरे टॉवरचा बिघाड दूर करण्यात आल्याने ग्राहकांच्या वतीने अधिकारी वर्गाचे आभार मानण्यात आले आहेत.