8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कोळोशी येथे मुंबई पोलीसाची अशी झाली हत्या | आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात ; आज करणार न्यायालयात हजर

कणकवली – तालुक्यातील देवगड निपाणी राज्य मार्गालगत कोळोशी वरची वाडी येथे दोन महिन्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सध्या गावी काही कामानिमित्त आलेले सहा. पो. उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर यांचा राहत्या घरात खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी ७:३० वा.च्या. सुमारास उघडकीस आली. खुनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परंतु यात मयत झालेले श्री. आचरेकर यांच्यासोबत घरी झोपण्यासाठी आलेले त्यांचे नातेवाईक ( चुलत पुतण्या ) सिध्दीविनायक उर्फ पप्पू संजय पेडणेकर ( वय – २४ ) याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने स्वतःहून श्री. आचरेकर यांच्या डोक्यात कुदळ मारल्याचे कबूल केले. त्यामुळे कणकवली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कणकवली पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली, यामध्ये त्याने सांगितलेल्या काही बाबींमध्ये विसंगती आढळली. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय अधिक वाढला. कणकवली पोलीस ठाण्यात देखील त्याने स्वतःहून कबुली दिली. त्यामुळे त्याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव व कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत विनोद मधूकर आचरेकर ( वय ५५, रा. कोळोशी वरचीवाडी ) हे मुंबई येथे सहा. पो. उपनिरीक्षक सेवेत होते. दोन महिन्यापूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे सर्व कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास असून दोन दिवसांपूर्वी मुंबईवरुन आपल्या गावच्या घरी ते आले होते. मात्र गुरुवारी सकाळी सिध्दीविनायक पेडणेकर ( वय २४ रा. कोळोशी वरचीवाडी ) याने त्यांचा खुन झाला असल्याची माहिती आपले वडील संजय पेडणेकर व १०० नंबर तसेच पोलीस, यांच्यासह १०८ रुग्णवाहीकेस दूरध्वनीव्दारे संपर्क साधून माहिती दिली.
सदर घटनेची माहिती पोलिस पाटील संजय गोरूले यांना मिळताच त्यांनी पोलिसांना खबर दिली. यानंतर कणकवली व देवगड पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी पहाणी केली असता, विनोद आचरेकर यांचा मृतदेह पूर्णपणे नग्नावस्थेत आढळून आले. तर डोक्याच्या मागच्या बाजूला जबर जखम झाल्याने घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव झालेला होता. यावेळी लगतच आढळलेली कुदळ डोक्यात मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला. तसेच घरातील डायनिंग टेबलवर दोन रिकामी काचेची ग्लास, एक मद्याची बाटली, जेवणाची ताटे, पिशवी, रक्ताने माखलेली बेडशीट पडलेली आढळून आली.


यावेळी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, कणकवली पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, अनिल हाडळ, स्थनिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, हेमंत खोपडे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, पोलीस कॉन्स्टेबल राज आघाव, पोलिस पाटील संजय गोरूले, सरपंच गुरू आचरेकर, ग्रामसेवक मंगेश राणे यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी करुन पुढील प्राथमिक तपास करण्यास कार्यवाही करण्यास सुरवात केली.
यानतंर सिंधुदुर्ग पोलीस शाखेचे अंगुली मुद्रा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, श्वान पथक दाखल झाले. तसेच संशयित आरोपी सिध्दीविनायक उर्फ पप्पू पेडणेकर याला कणकवली पोलीसांनी ताब्यात घेत पुढील तपासासाठी कणकवली पोलीस ठाणे येथे आणले. संशयित आरोपी हा मयत श्री. आचरेकर यांचा चुलत पुतण्या असून अधिक तपासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
विनोद आचरेकर यांच्या खुनाच्या प्रकाराबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहीत मुलगी व मुलगा असा परिवार आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची भेट

कोळोशी येथील थरारक घटनेची माहिती जिल्हाभर पसरताच सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. यावेळी अति. जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी भेट देऊन घटनेच्या तपासाची माहिती घेतली.

माहिती दिली आणि तोच फसला

मयत विनोद आचरेकर व संशयित आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर एकाच घरात रात्रभर होते. यातनंर काय घडले याची खरी माहिती समजली नसून आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर यांनी आपले वडील व १०८ रुग्णवाहीका तसेच १०० नंबर वर फोन करून माहिती दिली. यावेळी दोन्ही यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस पाटील संजय गोरुले यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. पोलीस पाटील संजय गोरुले यांनी घटनास्थळी पहाणी केली. यावेळी मिळालेली माहिती सत्य असल्याचे उघड झाले. यावेळी घटनास्थळी पहाणी करण्यात आली असता संशयित आरोपी मयत विनोद आचरेकर यांच्या अंगावर पडून असलेल्या स्थितीत दिसून आले. यावेळी पोलीस पाटील संजय गोरुले यांनी पोलीसांना माहिती दिली.

संशयित आरोपी पोलीसांना करायचा फोन 

संशयित आरोपी हा नेहमीच पोलीसांना कॉल करुन आपण हरवल्याचे सांगत असायचा. तसेच त्याला शोधण्यासाठी पोलीस भर रानावनात त्याचा शोध घ्यायचे. मात्र नतंर तो आपणच कॉल केला असल्याचे सांगायचा. यामुळे पोलीसांची अनेक वेळा त्याने तारांबळ उडविली होती, अशी माहिती खुद्द पोलीसांकडूनच मिळाली. यामुळे आजचा कॉल तसाच होता की काय.? असा त्यांना प्रश्न पडला. मात्र ही घटना थरकाप उडवणारी होती.

आरोपीला रिल्स चे वेड

सदरच्या घटनेत संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर हा रिल्स स्टार म्हणून ओळखला जायचा. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो, विडिओ, रिल्स देखील व्हायरल झाले होते. दिसायला खुद्द स्त्री वेशातच असायचा. काही विडिओ आणि फोटो देखील स्त्री वेशातच असलेल्या स्थितीत व्हायरल देखील झाले होते. घरच्यांना शंका आल्याने त्याचे वडील संजय पेडणेकर यांनी मानसोपचार तज्ञ यांच्याकडे तपासणीसाठी नेले मात्र तेथील अहवाल देखील नॉर्मल होता. त्यामुळे सिद्धिविनायक हा कोणत्यातरी आजाराने त्रस्त असेल ही शंका दूर झाली होती. परंतु सिद्धिविनायक यांचे फोटो, विडिओ, रिल्स पाहून आश्चर्य चकित झाले होते. मात्र सद्यस्थतीत मृत झालेल्या व्यक्तीला न्याय मिळणे महत्वाचे आहे.याबाबत अधीक तपास पो.नि.भरत धुमाळ करत आहेत.अशी माहीती कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि.राजेंद्र पाटील यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!