येथील मार्गावर जंगली जनावरांचाही मोठा वावर | वारंवार पथदिपांची देखील मागणी
कणकवली – शहरा नजीक असलेल्या हळवल गावात हळवल परतवाडी ते भाकरवाडी – शिवडाव जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडे वाढली आहे. या मार्गावर मागील अनेक महिने पथदिपांची मागणी केली जात होती. मात्र अद्यापही या मार्गावर पथदीप बसविण्यात आले नाहीत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जंगली जनावरांचा देखील वावर अनेकदा प्रत्यक्ष पाहायला मिळालेला आहे. गावरेडे, बिबट्या यासारखे प्राणी या मार्गावर थेट रस्त्यावर आलेले अनेकांनी पाहिले आहे. तसेच समोरून एखादी गाडी आली तर त्या गाडीला बाजू देणे देखील या मार्गावर शक्य होत नाही. बहुतांश वेळा या दाट झाडीमुळे पवारवाडी ते भाकरवाडी दरम्यानच्या मार्गावर अपघात होता होता वाचले आहेत. या मार्गावरून शाळेत येणाऱ्या – जाणाऱ्या लहान मुलांची मोठी वर्दळ असते. पावसाळा उलटून दोन महिने होत आले तरी या मार्गावरील झाडी तोडण्याचे काम अद्यापही हाती घेतले नाही. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली साईड पट्टी देखील पाण्याच्या लोटा बरोबर वाहून गेली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
याबाबत स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली असता, त्यांच्याकडून याबाबत कोणतीही सकारात्मक माहिती दिली गेली नाही. परंतु हा रस्ता जिल्हा परिषदच्या अंतर्गत येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.मात्र आता तरी स्थानिक प्रशासन व तालुकास्तरीय प्रशासनाचे अधिकारी या बाबतचे गांभीर्य लक्षात घेता मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी हटवतील का..? असाच संताप जनक सवाल नागरिक व वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे.